प्रताप पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या चिरंजीवांचा उमेदवारी अर्ज; अधिकृत घोषणेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
जळगाव : राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठी राजकीय हालचाल सुरू असताना जळगाव विधान परिषद मतदारसंघाबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. जळगावची जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला सोडण्यात आल्याची खात्रीलायक माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांचे उमेदवारीचे तिकीट जवळपास निश्चित झाल्याची चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे, प्रताप पाटील यांनी आज विधान परिषद निवडणुकीचा अर्ज घेतल्याने त्यांच्या उमेदवारीच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. आता फक्त शिवसेना पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
प्रताप पाटील हे केवळ राजकीय वारसा लाभलेले नाव नसून, स्वतःच्या कार्यशैलीतून जनतेमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण करणारे युवा नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी, युवक, महिला तसेच स्थानिक कार्यकर्त्यांशी त्यांचा सातत्यपूर्ण संपर्क असल्याने ते सहज उपलब्ध आणि जनतेच्या प्रश्नांवर तत्काळ प्रतिसाद देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
बारा महिने चोवीस तास जनतेसाठी कार्यरत राहण्याची त्यांची कार्यपद्धती कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. सामाजिक बांधिलकी जपत विविध विकासकामांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून, त्यामुळे भविष्यातील प्रभावी राजकीय चेहरा म्हणून त्यांच्या नेतृत्वाकडे पाहिले जात आहे.
संघटन कौशल्य, शांत आणि संयमी स्वभाव, अभ्यासू वृत्ती तसेच निर्णयक्षम नेतृत्व ही प्रताप पाटील यांची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात. युवा वर्गात वाढती लोकप्रियता आणि महायुतीतील विविध घटक पक्षांशी असलेला समन्वय यामुळे त्यांची उमेदवारी अधिक भक्कम समजली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनुभव, मजबूत जनसंपर्क आणि सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सातत्याने असलेली उपस्थिती यामुळे प्रताप पाटील यांनी अल्पावधीतच स्वतःचा स्वतंत्र राजकीय ठसा उमटवला आहे. त्यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत ते महायुतीसाठी सक्षम आणि विजयी उमेदवार ठरू शकतात, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान, महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असून, जळगावच्या राजकीय वर्तुळात आता अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
