Spread the love

बकरी ईदच्या दिवशी चाळीसगावात शोककळा; चार मित्र बचावले, मोईन झारेकरीचा पाण्यात बुडून अंत

जळगाव : बकरी ईदच्या आनंदाच्या वातावरणावर चाळीसगाव तालुक्यातील एका दुर्दैवी घटनेने विरजण घातले आहे. पिराचे बोरखेडा येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मोईन जाकीर झारेकरी (वय २०, रा. घाटरोड, चाळीसगाव) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील नागदरोड परिसरातील पाच मित्र गुरुवारी दुपारी बोरखेडा धरणावर पोहण्यासाठी गेले होते. धरणात पोहत असताना मोईन झारेकरी याला पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तातडीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही.

घटनेची माहिती मिळताच मोईनच्या नातेवाईकांसह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. उपनगराध्यक्ष हर्षल चौधरी, नगरसेवक अनिल ठाकरे, संभाअप्पा जाधव, फकिरा मिर्झा, बाबा ठेकेदार, मुकेश चौधरी आणि रोशन जाधव यांच्यासह अनेकांनी शोधकार्यात सहभाग घेतला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने धरणात सुमारे तीन ते चार तास शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मोईनचा मृतदेह गाळात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर परिसरात शोककळा पसरली.

मोईन हा अत्यंत हुशार आणि होतकरू विद्यार्थी होता. तो वैद्यकीय शिक्षण घेत असून डॉक्टर बनण्याचे त्याचे स्वप्न होते. आपल्या मुलाने डॉक्टर होऊन समाजात नाव कमवावे, अशी अपेक्षा त्याच्या कुटुंबीयांची होती. मात्र नियतीने घात केले आणि एका क्षणात कुटुंबाच्या सर्व आशांवर पाणी फिरले.

विशेष म्हणजे, बकरी ईदच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने झारेकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सणाच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाल्याने परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. मोईनच्या अकाली निधनामुळे मित्रपरिवार, नातेवाईक आणि नागरिकांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version