पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त भव्य हरिनाम सप्ताहात स्त्री सन्मानाचा प्रभावी जागर
पाळधी/धरणगाव/जळगाव : पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र पाळधी येथे जीपीएस ग्रुप व युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित भव्य अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहात भक्ती, अध्यात्म आणि समाजप्रबोधनाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळत आहे. सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी अवघ्या ११ वर्षीय बाल कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज जाऊरकर यांनी आपल्या ओजस्वी, रसाळ आणि प्रभावी कीर्तनातून हजारो भाविकांना मंत्रमुग्ध करत स्त्री सन्मानाचा जागर घडविला.
“२०२७ मध्ये नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे; मात्र भगवंताच्या भक्तांचा कुंभमेळा आज पाळधीत भरला आहे,” असे गौरवोद्गार काढत ज्ञानेश्वर माऊली महाराजांनी संत साहित्य, अभंग आणि हरिनामाच्या माध्यमातून समाजाला संस्कारांची दिशा दिली. “मुलींचा वीट धरू नका, कन्या सर्वश्रेष्ठ आहे; स्त्री ही पूजनीय आणि वंदनीय आहे,” असे मार्मिक प्रतिपादन करत त्यांनी स्त्री सन्मानाचा प्रभावी संदेश दिला. त्यांच्या या हृदयस्पर्शी विचारांना उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
कीर्तनादरम्यान सादर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरील पोवाड्याने वातावरण भारावून गेले. यावेळी प्रतापराव पाटील यांनी भक्तिभावाने ठेका धरत उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. त्यांच्या या सहभागाचे कौतुक करत महाराज म्हणाले, “नाचणे अनेकांना जमतं; पण हरिनामाच्या रंगात रंगून भक्तिभावाने नाचणे हे दुर्मिळ भाग्य आहे.” पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली जीपीएस मित्र परिवाराने आयोजित केलेला हा हरिनाम महोत्सव समाजाला भक्ती, संस्कार आणि एकात्मतेची प्रेरणा देणारा असल्याचे सांगत त्यांनी आयोजकांचे विशेष अभिनंदन केले.
या महोत्सवासाठी पंचक्रोशीतील तब्बल २३ ते २५ गावांमधून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. महोत्सवाची भव्यता, शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण राज्यभर या सोहळ्याची चर्चा रंगू लागली असून पाळधी नगरी सध्या हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेली आहे. सप्ताहासाठी उभारण्यात आलेला सुसज्ज व भव्य सभा मंडप, अत्याधुनिक ध्वनिक्षेपण व्यवस्था, आकर्षक प्रकाशयोजना आणि भव्यदिव्य व्यासपीठ हे विशेष आकर्षण ठरत आहे. एकावेळी पाच हजारांहून अधिक भाविक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली असून भाविकांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महिला, वारकरी, युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच पुरुष वर्गाची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभत असून संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या अखंड गजराने दुमदुमून गेला आहे.
यावेळी पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच ह.भ.प. गजाननजी महाराज वरसाडेकर, ह.भ.प. गोपाल महाराज डोणगावकर, ह.भ.प. जितेंद्र महाराज डोणगावकर, ह.भ.प. यज्ञेश महाराज माळी, ह.भ.प. मयूर महाराज तरवाडेकर, ह.भ.प. कैलास महाराज पवार, ह.भ.प. परमेश्वर महाराज पाळधीकर, ह.भ.प. निंबा महाराज वाघडूतकर, ह.भ.प. संदीप महाराज झुरखेडेकर व ह.भ.प. गोपाल महाराज दापोरेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
भक्ती, अध्यात्म, संस्कार आणि समाजजागृतीचा संगम घडविणारा हा भव्य हरिनाम सप्ताह सध्या संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या आकर्षणाचे केंद्र ठरत असून दररोज हजारो भाविक हरिनामाचा लाभ घेत आहेत.
हरवलेल्या चिमुकलीला मिळवून दिले कुटुंब
दरम्यान, सप्ताहातील गर्दीदरम्यान युवा नेते प्रतापराव पाटील यांच्या संवेदनशीलतेचे हृदयस्पर्शी दर्शन घडले. कार्यक्रमस्थळी गर्दीत हरवून रडत असलेल्या एका चिमुकलीला त्यांनी धीर देत तिच्या पालकांचा शोध सुरू केला. कार्यकर्त्यांच्या मदतीने काही वेळातच मुलीची तिच्या आई-वडिलांशी भेट घडवून आणण्यात यश आले. आपल्या मुलीला सुखरूप पाहून पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. या प्रसंगी जीपीएस मित्र परिवाराचे ज्येष्ठ सदस्य प्रशांत झंवर यांनीही मोलाचे सहकार्य केले. या घटनेमुळे प्रतापराव पाटील यांच्या माणुसकीपूर्ण आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वाचे पुन्हा एकदा दर्शन घडल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.
