Spread the love

प्रभा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक व श्री स्वामी समर्थ केंद्राचा सामाजिक उपक्रम; तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व तपासणी

 रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉ. युवराज रोटे व डॉ. हरीश काळे यांचे मार्गदर्शन • उपचारांवर विशेष सवलतीची सुविधा • नागरिकांकडून उपक्रमाचे स्वागत

नशिराबाद : येथील प्रभा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक आणि श्री स्वामी समर्थ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत दंत तपासणी व सल्ला शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये नशिराबाद व परिसरातील तब्बल ७० रुग्णांची मोफत दंत व मुख आरोग्य तपासणी करण्यात आली.

न्यू इंग्लिश स्कूलसमोरील श्री स्वामी समर्थ केंद्र येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. दातांचे आरोग्य, तोंडाचे आजार तसेच मुख स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विविध वयोगटातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. शिबिरात प्रसिद्ध रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉ. युवराज रोटे (B.D.S., M.D.S.) आणि दंतचिकित्सक डॉ. हरीश काळे यांनी उपस्थित रुग्णांची सखोल तपासणी केली. यावेळी दातांचे विविध आजार, हिरड्यांच्या समस्या, मुख आरोग्य, तोंडातील संसर्ग तसेच आवश्यक उपचारांबाबत रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले. तोंडाच्या विविध शस्त्रक्रियांविषयीही उपस्थितांना माहिती देण्यात आली.

शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये विशेष सवलत मिळावी यासाठी डिस्काउंट कार्ड देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. त्यामुळे नागरिकांना दर्जेदार दंतसेवा कमी खर्चात उपलब्ध होणार आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वामी समर्थ केंद्राचे केंद्रप्रमुख रोहिदास बाबा पाटील आणि देविदास बाबा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच गणेशभाऊ चव्हाण आणि मुकुंदाभाऊ रोटे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. शिबिरादरम्यान नागराजभाऊ महाजन आणि डॉ. प्रमोद आमोदकर यांनी सदिच्छा भेट देत या उपक्रमाचे कौतुक केले. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती होणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री स्वामी परिवार, नशिराबाद तसेच आयोजक टीमच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. पूर्वेश येवले, हितेश पाटील, युवराज मराठे, सचिन घोडकर, रोहन महाजन, जयेश पाटील, शुभम भावसार, तुषार रंधे, महेंद्र मराठे, अजय राणे, निलेश सुतार आणि प्रवीण मिस्तरी यांनी उपस्थित राहून व्यवस्थापनाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली. आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

🔹 ७० रुग्णांची मोफत दंत व मुख आरोग्य तपासणी
🔹 तज्ज्ञ दंतचिकित्सकांकडून मोफत सल्ला
🔹 रूट कॅनल व दंत उपचारांबाबत मार्गदर्शन
🔹 पुढील उपचारांसाठी विशेष सवलत कार्ड
🔹 नशिराबाद परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
🔹 सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य जनजागृतीचा उपक्रम

Share.
Leave A Reply

Exit mobile version