Spread the love

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान; मान्यवरांकडून उच्च शिक्षणासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन

नशिराबाद : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या यशाचा गौरव करण्याच्या उद्देशाने स्वयंशोध फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेला इयत्ता दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात नशिराबाद पंचक्रोशीतील तब्बल ९० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हिजन अकॅडमीचे संचालक अनिल माला होते. तर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षा व निंभोरा गाव सेवा समितीच्या युवा संयोजिका भाग्यश्री विवेक ठाकरे आणि ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या वृषाली महाजन या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण व्हावी, त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या यशाचे कौतुक व्हावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नशिराबादसह मन्यारखेडा, कळगाव, जळगाव खुर्द, सुनसगाव आणि कडगाव या गावांतील दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षण हेच यशाचे खरे साधन असल्याचे सांगत भविष्यातील ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण परिश्रम करण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य दिशा, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर ते कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती
या कार्यक्रमाला नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष पंकजभाऊ महाजन, नगरसेवक चेतनभाऊ बऱ्हाटे, शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेशभाऊ चव्हाण, मनसेचे जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदभाऊ रोटे, मनोज नाले यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे उपक्रम नियमितपणे राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या यशाला प्रोत्साहन देणारा उपक्रम
स्वयंशोध फाउंडेशनचे सचिव धीरज सैतवाल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यात सकारात्मक स्पर्धा निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन राजू पासपांडे सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम
स्वयंशोध फाउंडेशनचे सचिव धीरज सैतवाल, महेश सपकाळे, चेतन सपकाळे, सागर धोबी, विशाल सावळे, आदेश राजपूत आणि इतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version