Spread the love

नुकसानग्रस्त भागातील परिस्थितीची गंभीर दखल घेत प्रशासनाला युद्धपातळीवर कार्यवाहीचे निर्देश

वादळी पाऊस व वाऱ्यामुळे केळीसह विविध पिकांचे मोठे नुकसान

जळगाव : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे केळीसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसर, रावेर तालुक्यातील अनेक गावे तसेच जिल्ह्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

नुकसानग्रस्त भागातील परिस्थितीची गंभीर दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नुकसानग्रस्त क्षेत्रांचा तातडीने सर्वेक्षण करून युद्धपातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अंतुर्ली परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पाहणीदरम्यान झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिली.

यावेळी पालकमंत्र्यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, कोणत्याही नुकसानग्रस्त शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. ज्या-ज्या भागांमध्ये केळी, फळबागा किंवा इतर शेती पिकांचे नुकसान झाले आहे, त्या सर्व ठिकाणी तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करण्यात यावा. कोणताही पात्र शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.

“संकटाच्या या कठीण काळात शासन आणि जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांना आवाहन
जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे, फळबागांचे अथवा पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांनी घाबरून न जाता तात्काळ संबंधित तलाठी, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी किंवा ग्रामस्तरीय यंत्रणेशी संपर्क साधून नुकसानीची माहिती द्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. शासनाच्या निकषांनुसार मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही प्रशासनामार्फत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून पंचनामे आणि मदतीच्या प्रक्रियेकडे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version