रोहन घुगे यांची जामन्या, गाडऱ्या, उसमळी व लंगडाआंबा गावांना भेट; विकासकामांचा घेतला आढावा
यावल (सुपडू संदानशिव) : जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सातपुडा पर्वतरांगांतील दुर्गम आदिवासी भागात प्रत्यक्ष मुक्काम करून आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. गुरुवार, दि. ४ जून रोजी महसूल, वन व इतर विभागांच्या अधिकाऱ्यांसह त्यांनी यावल तालुक्यातील जामन्या, गाडऱ्या, उसमळी आणि लंगडाआंबा या गावांना भेट देत विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
जिल्हाधिकाऱ्यांसोबत नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी भवर, यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, रावेर तहसीलदार दीपा जेधे, वनक्षेत्रपाल दुसाने, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. संध्याकाळी जामन्या येथील वनविभागाच्या प्रांगणात आयोजित बैठकीत ग्रामस्थांनी आपल्या समस्या थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
बैठकीत स्वस्त धान्य दुकानांची कार्यपद्धती, जामन्या आरोग्य उपकेंद्रातील सुविधा, पाल-माथन व वाघझिरा-लंगडाआंबा रस्त्यांची अपूर्ण कामे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, शेतरस्ते, रोजगार हमी योजना, बांबू, डिंक व चारोळी उद्योगांना चालना, सिंचन सुविधा, कृषी योजना, शबरी योजनेअंतर्गत स्पाइस क्लस्टर, घरकुल योजना तसेच आधार सीडिंगमुळे प्रलंबित असलेले घरकुल प्रस्ताव आदी विषयांवर चर्चा झाली.
ग्रामस्थांनी गावांमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ उपलब्ध करून देण्याची तसेच कुसुम सोलर योजनेअंतर्गत अपूर्ण राहिलेले साहित्य वाटप पूर्ण करण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी चारही गावांसाठी संयुक्त सेवा केंद्र उपलब्ध करून देणे, रस्ते प्रश्न मार्गी लावणे आणि संपूर्ण परिसर सौरऊर्जायुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जामन्या येथील आरोग्य उपकेंद्र, स्वस्त धान्य दुकान, आश्रमशाळा तसेच पाझर तलाव येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. शाळेतील शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत इमारतीच्या दुरुस्तीबाबत सकारात्मक भूमिका घेतली.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लंगडाआंबा विश्रामगृह परिसरात आदिवासी बांधव, महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीताफळासह विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच वनविभागाने राबविलेल्या वृक्षलागवड व संवर्धन प्रकल्पांचीही पाहणी करण्यात आली.
यावेळी लंगडाआंबा, उसमळी आणि जामन्या येथे बसविण्यात आलेल्या बीएसएनएल मोबाईल टॉवरचीही प्रत्यक्ष पाहणी करून नेटवर्क सुविधेची चाचणी घेण्यात आली. दुर्गम भागातील नागरिकांना अधिक चांगल्या दूरसंचार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. दौऱ्याच्या शेवटी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सातपुडा परिसरातील प्रलंबित प्रश्नांचा पुन्हा आढावा घेण्यासाठी येत्या एक ते दीड महिन्यात पुनर्भेट देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या दौऱ्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन त्यांच्या दारी पोहोचल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
