Spread the love

रुंदीकरणाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचा आरोप; प्रशासनाने परवानग्या, तोडलेल्या झाडांची संख्या आणि पुनर्लागवडीचा तपशील जाहीर करण्याची मागणी

नंदुरबार (विजय निकम) : नंदुरबार जिल्ह्यातील कोळदा ते नंदुरबार मार्गावरील सुरू असलेल्या काँक्रीटीकरण आणि रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी केला असून, या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विकासकामांच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी दिला जात असल्याचा आरोप करत प्रशासनाने संपूर्ण प्रक्रियेबाबत पारदर्शक माहिती जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

एकीकडे शासन “झाडे लावा, झाडे जगवा” यांसारख्या अभियानांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असताना, दुसरीकडे रस्त्याच्या कामासाठी अनेक वर्षांपासून उभी असलेली हजारो झाडे तोडली जात असल्याचे चित्र समोर येत असल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. या वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची तसेच स्थानिक जैवविविधतेवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, रस्ता रुंदीकरणासाठी मार्गालगतची अनेक मोठी व जुन्या वृक्षांची तोड करण्यात आली आहे. उन्हाळ्यात प्रवाशांना सावली देणारी, पक्षी व लहान वन्यजीवांचे आश्रयस्थान ठरणारी ही झाडे एका मागोमाग एक नष्ट होत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

पर्यावरण कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, शासनाच्या नियमांनुसार एका झाडाच्या तोडीच्या बदल्यात अनेक झाडांची लागवड करणे आवश्यक असते. मात्र प्रत्यक्षात पर्यायी वृक्षारोपण किंवा पुनर्लागवडीची प्रभावी व्यवस्था दिसून येत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या विकासासोबत पर्यावरण संवर्धनालाही समान प्राधान्य दिले जावे, अशी मागणी होत आहे.

यासंदर्भात संबंधित विभागाने किती झाडे तोडण्यात आली, वृक्षतोडीसाठी कोणत्या प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली, पर्यावरणीय मंजुरीची प्रक्रिया कशी पूर्ण करण्यात आली आणि बदल्यात किती झाडे व कोणत्या ठिकाणी लावली जाणार आहेत, याची सविस्तर माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून करण्यात आली आहे.

वाढते तापमान, बदलते हवामान आणि अनियमित पावसाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड हा गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. विकासकामे आवश्यक असली तरी ती पर्यावरणपूरक पद्धतीने राबविणे ही काळाची गरज असल्याचे मतही अनेक नागरिकांनी व्यक्त केले.

“रस्ते विकासासाठी असतात; मात्र विकासाच्या नावाखाली निसर्गाची अपरिमित हानी करणे कितपत योग्य?” असा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, वृक्षतोडीबाबत पारदर्शक माहिती जाहीर करावी आणि व्यापक वृक्षारोपण मोहीम तातडीने राबवावी, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version