पिंपरी-चिंचवडमध्ये मंडप परवाना शुल्कात मोठी तफावत; सर्व प्रभागांत समान दर आकारणीची सचिन काळभोर यांची मागणी
पिंपरी : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या परवाना शुल्कामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मोठी तफावत असल्याचा गंभीर आरोप भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून सर्व प्रभागांमध्ये मंडप परवान्यासाठी एकसमान शुल्क आकारणी लागू करण्याची मागणी केली आहे.
‘अ’ क्षेत्रात १० रुपये, ‘फ’ क्षेत्रात ५० रुपये; नेमका फरक कशामुळे?
काळभोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयात मंडप परवान्यासाठी प्रति चौरस फूट १० रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयात त्याच प्रकारच्या मंडपासाठी प्रति चौरस फूट ५० रुपये आकारले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. एकाच महानगरपालिका हद्दीत वेगवेगळे दर आकारले जात असल्याने नागरिक, सामाजिक संस्था आणि मंडळांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून अनेकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पालखी सेवेसाठी उभारल्या जाणाऱ्या मंडपांवर आर्थिक ताण
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दरवर्षी विविध संस्था, मंडळे आणि स्वयंसेवी संघटनांकडून वारकरी बांधवांसाठी मोफत अन्नदान, वैद्यकीय सेवा, औषध वाटप, चहा-नाश्ता, रेनकोट व छत्री वाटप यांसारखे सेवाभावी उपक्रम राबविले जातात. मात्र, मंडप परवान्याच्या वाढीव शुल्कामुळे अशा सामाजिक उपक्रमांच्या आयोजनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
खाजगी विकासकांना सवलत, सेवाभावी संस्थांना जादा शुल्क?
सचिन काळभोर यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, महापौर मैदानावर भाडेतत्त्वावर खाजगी विकासकांना प्रति चौरस फूट १० रुपये दराने मंडप परवानगी दिली जाते. परंतु, पालखी सोहळ्यासाठी ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाकडून ५० रुपये प्रति चौरस फूट दर आकारला जात असल्याने संस्था, मंडळे आणि सामाजिक कार्यकर्त्यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सर्व आठ प्रभागांत समान व वाजवी शुल्काची मागणी
महानगरपालिका हद्दीतील सर्व आठ प्रभागांमध्ये मंडप परवाना शुल्काचा एकसमान व सुसंगत दर निश्चित करावा, अवाजवी शुल्क आकारणी तातडीने रद्द करावी आणि संबंधित प्रकरणाची चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी आयुक्तांकडे केली आहे. पालखी सोहळ्यासारख्या धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
