Spread the love

निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांची तीव्र प्रतिक्रिया

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी ऑपरेशन ब्लू स्टारच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त अमृतसर येथे केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. कार्यक्रमात ऑपरेशन ब्लू स्टारचा उल्लेख ‘काळा दिवस’ असा करताना भारतीय सैन्याविरोधात लढलेल्या विभाजनवादी व्यक्तींचा उल्लेख ‘शहीद’ असा केल्याचा आरोप होत असून, या पार्श्वभूमीवर निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘हे केवळ वादग्रस्त नव्हे, तर दुर्दैवी विधान’
गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कर्नल अभय पटवर्धन म्हणाले, “हे केवळ वादग्रस्त विधान नाही, तर अत्यंत दुर्दैवी विधान आहे. महाराष्ट्राचे मंत्री म्हणून गिरीश महाजन यांना त्या काळातील परिस्थितीची माहिती असायला हवी होती. जर्नैलसिंग भिंद्रनवाले खलिस्तानची घोषणा करण्याच्या तयारीत होते. त्यासाठी स्वतंत्र चलन, पासपोर्ट, पत्रके आणि लेटरहेडसुद्धा तयार करण्यात आले होते.”

‘पाकिस्तानच्या कटाला हाणून पाडण्यासाठी कारवाई’
पटवर्धन यांच्या म्हणण्यानुसार, त्या काळात पाकिस्तानचा मोठा डाव होता. “भिंद्रनवाले सुवर्ण मंदिरातून खलिस्तानची घोषणा करतील आणि त्याच वेळी पाकिस्तान अमृतसरवर हल्ला करून शहर ताब्यात घेईल. पठाणकोटवरही हल्ल्याचा कट होता. या योजनेची माहिती भारत सरकारला मिळाल्यानंतरच ऑपरेशन ब्लू स्टार राबविण्यात आले,” असे त्यांनी सांगितले.

‘देशविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई हे सरकारचे कर्तव्य’
या कारवाईत भिंद्रनवाले आणि माजी लष्करी अधिकारी शाबेग सिंग यांचा मृत्यू झाला होता. याबाबत बोलताना पटवर्धन म्हणाले, “शाबेग सिंग आमच्यासोबत ब्रिगेडियर म्हणून कार्यरत होते. मात्र नंतर त्यांनी भिंद्रनवाले यांची साथ दिली. एखादी व्यक्ती कितीही चांगली असली तरी ती देशाविरोधात उभी राहत असेल, तर तिच्यावर कारवाई करणे हे सरकारचे कर्तव्य असते आणि तेच त्या वेळी करण्यात आले.”

‘महाजनांच्या वक्तव्यामुळे सैनिकांचा अपमान’
पुढे ते म्हणाले, “आम्हीही सुवर्ण मंदिर परिसरात कारवाईसाठी गेलो होतो. आमच्याकडे मर्यादित साधनसामग्री होती. आजही काहीजण भिंद्रनवाले यांचा स्मृतिदिन शहीद दिन म्हणून साजरा करतात. अशा वेळी गिरीश महाजन तेथे का गेले, हे मला माहीत नाही. कदाचित पंजाबमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतू असू शकतो. मात्र त्यांनी केलेल्या विधानामुळे आमच्या सैनिकांचा अपमान झाला असून मी त्या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो.” गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विरोधकांकडूनही त्यांच्या भूमिकेवर टीका केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर महाजन यांची अधिकृत भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version