मागील वादातून लोखंडी रॉडने हल्ला करून केली हत्या; जंगलातून आरोपीला अटक, गुन्ह्याची दिली कबुली
धुळे (सुनील निकम) : निकुंभे (ता. जि. धुळे) येथे मागील वादातून एका ५० वर्षीय व्यक्तीची लोखंडी रॉडने डोक्यात वार करून हत्या करणाऱ्या आरोपीला अवघ्या ४८ तासांच्या आत स्थानिक गुन्हे शाखा आणि सोनगीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास निकुंभे येथील शानाभाऊ संभू पाटील (वय ५०) यांच्यावर आरोपी दशरथ किसन ठाकरे (वय २२, रा. निकुंभे, ता. जि. धुळे) याने मागील वादाच्या कारणावरून लोखंडी रॉडने डोक्यात गंभीर वार केले. या हल्ल्यात शानाभाऊ पाटील यांचा मृत्यू झाला असून घटना घडल्यानंतर आरोपी जंगलात फरार झाला होता.
या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), १०९ आणि ३५२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला अटक
आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि सोनगीर पोलिसांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मेहरगाव (ता. जि. धुळे) येथील जंगलातून आरोपी दशरथ ठाकरे याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीदरम्यान आरोपीने मागील वादातूनच शानाभाऊ पाटील यांची हत्या केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सहारे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत ताकाटे, रविंद्र बागुल तसेच पोलीस अंमलदार संजय बोरसे, राहुल सानप, आरिफ पठाण, अमरीश सानप, अमोल पाटील, अमोल जाधव, प्रदीप धिवरे, राहुल पाटील आणि रोहन वाघ यांनी सहभाग घेतला. अवघ्या ४८ तासांत आरोपीला जेरबंद करण्यात आल्याने स्थानिक गुन्हे शाखा आणि सोनगीर पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक होत आहे.
