बदलापूरातील धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप; रिकव्हरी एजंटविरोधात एनसी दाखल
बदलापूर ठाणे (प्रशांत ढोणे) : कर्जवसुलीच्या नावाखाली नागरिकांच्या घरात घुसून दमदाटी, दादागिरी आणि जोरजबरदस्तीचे प्रकार वाढत असल्याची गंभीर बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. बदलापूर पश्चिम परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत बँकेच्या कथित रिकव्हरी एजंटने थेट संबंधित व्यक्तीच्या घरात प्रवेश करून दबाव टाकल्याचा आणि मारहाणीचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जाच्या थकबाकीच्या वसुलीसाठी आलेल्या एका रिकव्हरी एजंटने कोणतीही पूर्वसूचना, कायदेशीर नोटीस किंवा न्यायालयाचा आदेश नसताना संबंधित कुटुंबाच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर आक्रमक भूमिका घेत कुटुंबीयांवर दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित रिकव्हरी एजंटविरोधात अदखलपात्र गुन्हा (एनसी) नोंदवून चौकशी सुरू केली. चौकशीसाठी संबंधित एजंटला पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, पोलिसांच्या समन्सनंतरही तो चौकशीसाठी उपस्थित राहिला नसल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर बदलापूरसह ठाणे जिल्ह्यात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून कर्जवसुलीच्या नावाखाली काही एजंटांकडून कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन दबावतंत्राचा वापर होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करण्याऐवजी त्यांच्यावर मानसिक दबाव आणण्याचे प्रकार थांबविण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून संबंधित एजंट चौकशीसाठी हजर न राहिल्याने त्याच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे खासगी कर्जवसुली संस्थांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कर्जवसुलीच्या नावाखाली धमकी, दमदाटी किंवा बेकायदेशीरपणे घरात घुसून वसुली करण्याचा प्रयत्न झाल्यास घाबरून न जाता तात्काळ पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा.
