अज्ञात चोरट्यांनी ६५ हजारांचा ऐवज पळवला; पारोळा पोलिसांकडून तपास सुरू
पारोळा : तालुक्यातील धरणगाव रस्त्यावरील पिंपरखेड येथील प्रसिद्ध मारुती मंदिरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत मूर्तीवरील चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराचे पूजारी आसाराम त्र्यंबक पाटील (वय ६९, रा. बहादरपूर, ता. पारोळा) यांनी नेहमीप्रमाणे ८ जून २०२६ रोजी मंदिरातील पूजा आणि साफसफाई पूर्ण करून रात्री मंदिराला कुलूप लावले. त्यानंतर ते जवळील राम मंदिर परिसरात झोपण्यासाठी गेले होते.
दुसऱ्या दिवशी ९ जून रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास ते पूजा करण्यासाठी मंदिरात आले असता मारुतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुकूट आणि कानातील चांदीची मासळी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी गाभाऱ्यात प्रवेश करून दागिने चोरून नेले होते. मात्र, मूर्तीच्या गळ्यातील चांदीचा हार जागेवरच आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पूजारी आसाराम पाटील यांनी मंदिराचे विश्वस्त वासुदेव सोनार तसेच ग्रामस्थांना कळविले. परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली, मात्र चोरीस गेलेले दागिने सापडले नाहीत.
६५ हजारांचा मुद्देमाल चोरीला
चोरट्यांनी मंदिरातून सुमारे ५०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकूट (अंदाजे किंमत ५० हजार रुपये) तसेच सुमारे १५० ग्रॅम वजनाची चांदीची मासळी (अंदाजे किंमत १५ हजार रुपये) असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणी पूजारी आसाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ अन्वये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल कैलास सुरेश साळुंके आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण पाटील करीत आहेत.
ग्रामीण भागातील मंदिरात झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
