नोबेल फाऊंडेशन, ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सोसायटीचा संयुक्त उपक्रम; विद्यार्थ्यांना करिअर व स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन
गावातील पहिल्या महिला पोलीस भाग्यश्री पाटील यांचा विशेष गौरव • अग्निवीरपदी निवड झालेल्या दोन युवकांचा सन्मान • दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार
कल्याणेहोळ (विनोद भिल्ल) : गावातील गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणारे युवक-युवती तसेच देशसेवेसाठी निवड झालेल्या तरुणांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला भव्य गुणवंत सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नोबेल फाऊंडेशन, जळगाव, ग्रुप ग्रामपंचायत कल्याणेहोळ आणि विविध कार्यकारी सोसायटी, कल्याणेहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गावातील पहिल्या महिला पोलीस बनण्याचा मान मिळविणाऱ्या भाग्यश्री समाधान पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच अग्निवीर पदासाठी निवड झालेल्या हर्षल बंडू पाटील आणि भरत सुरेश पाटील यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यांच्या यशामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यासोबतच इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या आई-वडिलांसह सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीपीएस फाऊंडेशन, पाळधीचे प्रतापराव गुलाबराव पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजाराम पाटील, सरपंच रणजित पाटील, सोपान पाटील तसेच ग्लोबल मिशन स्कूल, बाहुटेचे संचालक व उद्योजक मनोहर पाटील आणि शिक्षक राहुल पाटील उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती, स्पर्धा परीक्षांचे महत्त्व, करिअर नियोजन, मुला-मुलींची सुरक्षितता आणि सामाजिक जबाबदारी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून चिकाटी, मेहनत आणि सातत्याच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयदीप पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक रमेश राजाराम पाटील यांनी केले. समाधान पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोंजनासाठी पोलीस पाटील दीपक ऊखर्डू पाटील, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. गावातील गुणवंतांचा गौरव करून नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, मोठ्या संख्येने उपस्थित पालक व विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
