Spread the love

रक्तसाठ्याची कमतरता दूर करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा; शतकवीर रक्तदाता मुकुंद गोसावी यांचे आवाहन

१४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिन • थॅलेसीमिया, सिकलसेल, हिमोफिलिया व अपघातग्रस्त रुग्णांसाठी रक्ताची गरज • दिव्यांग असूनही १०० हून अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या मुकुंद गोसावी यांचा प्रेरणादायी संदेश

जळगाव : १४ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक रक्तदाता दिनानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान द्यावे, असे आवाहन शतकवीर रक्तदाता व रक्तदान जनजागृती कार्याचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर मुकुंद गोसावी यांनी केले आहे. “एक रक्तदान देईल अनेक गंभीर पीडितांना जीवनदान” हा संदेश देत त्यांनी समाजातील प्रत्येक सक्षम नागरिकाने या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकाद्वारे केले आहे.

सध्या तप्त उन्हाळा आणि बदलत्या हवामानामुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, थॅलेसीमिया, हिमोफिलिया, सिकलसेल, रक्तक्षयग्रस्त रुग्ण, गर्भवती माता, प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिला, विविध शस्त्रक्रियांसाठी उपचार घेणारे रुग्ण तसेच अपघातग्रस्तांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणे मोठे आव्हान ठरत आहे.

मुकुंद गोसावी यांनी सांगितले की, गंभीर रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नियमित रक्तसाठा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन आणि स्वयंस्फूर्त रक्तदात्यांची संख्या वाढणे काळाची गरज बनली आहे.

त्यांनी रक्तदानासंदर्भातील गैरसमज दूर करत स्पष्ट केले की, १८ वर्षांवरील आणि किमान ५० किलो वजन असलेली कोणतीही निरोगी व्यक्ती सहजपणे रक्तदान करू शकते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे एका रक्तदानातून विविध रक्तघटक तयार केले जातात. त्यामुळे एकाच व्यक्तीच्या रक्तदानातून अनेक रुग्णांना उपचारासाठी आवश्यक घटक उपलब्ध होऊन त्यांचे प्राण वाचवता येतात.

रक्तदानानंतर विशेष आहाराची आवश्यकता नसून नेहमीचा नियमित आहार पुरेसा असतो. रक्तदानामुळे अशक्तपणा किंवा कमजोरी येत नाही. उलट शरीरात नवीन रक्तपेशींची निर्मिती वेगाने होत असल्याने आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, पोलिओमुळे ७० टक्के शारीरिक दिव्यांगत्व असतानाही मुकुंद गोसावी यांनी आपल्या सशक्त इच्छाशक्तीच्या बळावर जवळपास १०० हून अधिक वेळा रक्तदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. “मला कोणताही त्रास होत नाही, उलट नेहमी उत्साही आणि प्रसन्न वाटते,” असे त्यांनी नमूद केले.

सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या संस्था, स्वयंसेवी संघटना, विविध आस्थापना, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्तपेढ्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, १४ जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त मुकुंद गोसावी यांनी तयार केलेल्या रक्तदान जनजागृती गीताचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. या गीताच्या माध्यमातून समाजात रक्तदानाविषयी अधिक जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

“आपल्या काही मिनिटांच्या रक्तदानातून अनेक गंभीर रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक सक्षम नागरिकाने रक्तदानासाठी पुढे यावे, हीच खरी मानवतेची सेवा आहे,” असे आवाहन मुकुंद गोसावी यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version