केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; पुणे शहरातील विविध पदाधिकाऱ्यांचीही घोषणा
पुणे (शंकर जोग) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) सामाजिक न्यायाच्या विचारधारेशी ख्रिश्चन समाजाला जोडण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या रिपब्लिकन ख्रिश्चन आघाडीच्या पुणे शहर अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते ख्रिस्तोफर राजमनी यांची नियुक्ती करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, आरपीआयची संघटनात्मक ताकद आणि सामाजिक न्यायाची विचारधारा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी, यासाठी रिपब्लिकन ख्रिश्चन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे हे पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास आरपीआयचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, पुणे शहर उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका इमानी कांबळे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
याच प्रसंगी रिपब्लिकन ख्रिश्चन आघाडीच्या पुणे शहर कार्यकारिणीतील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये पुणे शहर महिला अध्यक्षपदी डार्थी रोड्रिक्स, पुणे शहर उपाध्यक्षपदी येशू दोरास्वामी, पुणे शहर सचिवपदी कॉलिन वॉल्श, पुणे कॅम्प विभाग अध्यक्षपदी विनोद चंडालिया, हडपसर विभाग अध्यक्षपदी फ्रान्सिस सांतामात्यि, सोलापूर बाजार प्रभाग शाखाध्यक्षपदी स्टेनली फ्रान्सिस नेथन, वानवडी शाखाध्यक्षपदी विनेश पिल्ले, घोरपडी-मुंढवा प्रभाग अध्यक्षपदी रॉकी अँथोनी आणि कोंढवा शाखाध्यक्षपदी राजन राजमनी तसेच वडगाव शेरी शाखाध्यक्षपदी रॉबर्ट दास यांची नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी ख्रिश्चन समाजातील विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच सामाजिक ऐक्य आणि संघटन मजबूत करण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
