विविध प्रकारच्या तक्रारींसाठी नागरिकांना आवाहन
रेशन, वीज, बिल्डर, बँका, डॉक्टर, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, जमीन व्यवहारांसह २४ प्रकारच्या ग्राहक तक्रारींवर मोफत मार्गदर्शन व पाठपुरावा
मुंबई : ग्राहकांच्या न्याय हक्कांचे संरक्षण, शोषणमुक्त आणि भ्रष्टाचारविरहित समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य यांनी नागरिकांना विविध प्रकारच्या ग्राहक समस्यांबाबत पुढे येऊन तक्रारी नोंदविण्याचे आवाहन केले आहे. ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांवर संस्था मार्गदर्शन आणि आवश्यक पाठपुरावा करणार असल्याची माहिती संस्थेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
दादर (पश्चिम) येथील श्यामवाडी, रानडे रोड परिसरात मुख्य कार्यालय असलेल्या या संस्थेकडे रेशन दुकानांमधील सरकारी धान्य व रॉकेल वितरणातील गैरव्यवहार, घरगुती गॅस सेवा, चित्रपटगृहे, अवैध दारू विक्री, वजन-मापातील फसवणूक, मोबाईल खरेदी-विक्री व सेवा केंद्रांची निष्काळजीपणा, वीज वितरण कंपन्यांशी संबंधित तक्रारी, व्यापाऱ्यांकडून होणारी लूटमार, अन्नभेसळ तसेच अन्यायकारक व्यापारी प्रथांबाबत तक्रारी स्वीकारल्या जात आहेत.
याशिवाय औषध विक्रेत्यांकडून होणारी फसवणूक, फार्महाऊस किंवा खासगी घर-बंगल्यांशी संबंधित वाद, शाळा-महाविद्यालयांतील प्रवेश व देणगी शुल्क, वकिलांकडून न्यायालयीन कामातील निष्काळजीपणा, सरकारी व खासगी नोकरीतून काढून टाकण्याचे प्रकार, सोने-चांदी खरेदी-विक्री व्यवहार, रेल्वे, एसटी व ट्रॅव्हल्स सेवा, डॉक्टरांकडून होणारी सेवा त्रुटी, शेतकरी व बँकांशी संबंधित फसवणूक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गैरव्यवहारांबाबतही नागरिकांना तक्रार करता येणार आहे.
जमीन खरेदी-विक्री, बिल्डरांकडून होणारी फसवणूक, म्हाडा, एसआरए आणि सरकारी जमिनीवरील सदनिकांशी संबंधित प्रकरणे तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाविरोधातही संस्था ग्राहकांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर आमकर यांनी नागरिकांनी अन्याय सहन न करता कायदेशीर मार्गाचा अवलंब करून आपल्या हक्कांसाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे. तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष दिपक तांबे आणि संपर्क प्रमुख संतोष पाठक यांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातील नागरिकांनाही मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या विषयांमध्ये योग्य सल्ला, मार्गदर्शन आणि न्याय मिळवून देण्यासाठी संस्था कार्यरत असून, अधिकाधिक नागरिकांनी आपल्या समस्या संस्थेकडे मांडाव्यात, असे आवाहनही प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आले आहे.
