Spread the love

‘ऑन द स्पॉट’ पाहणीत गंभीर अनियमिततेचा आरोप, महापालिका आयुक्तांना प्रत्यक्ष पाहणीचे खुले आव्हान

वाढीव टेंडर आणि निधी खर्चावरही उपस्थित केले प्रश्न

धुळे (सुनील निकम) : धुळे महानगरपालिकेने शहरातील ८० टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये नाले कचऱ्याने तुडुंब भरलेले असून साफसफाईचे काम सुरूही झालेले नाही, असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध भागांतील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल केल्याचा दावा करण्यात आला आहे.

शिवसेना उबाठा पदाधिकाऱ्यांनी शहरातील सुमारे ४० किलोमीटर लांबीच्या नाल्यांची पाहणी केली. या पाहणीत अनेक ठिकाणी केवळ दर्शनी भागात थातूरमातूर साफसफाई करण्यात आल्याचे दिसून आले. तर काही नाल्यांमध्ये अद्याप कोणत्याही प्रकारची स्वच्छता मोहीम राबविण्यात आलेली नसून ते कचऱ्याने भरलेले असल्याचा आरोप करण्यात आला.

पक्षाच्या म्हणण्यानुसार मोती नाला, सुशी नाला, हगरया नाला, भरतनगर, तुळशीराम नगर, प्रोफेसर कॉलनी, जीटीपी परिसर, सिंचन भवनामागील नाला, मिलचा नाला तसेच सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील नाल्यांची स्थिती अद्यापही ‘जैसे थे’ असून त्या ठिकाणी प्रभावी नालेसफाई झाल्याचे कोणतेही चित्र दिसून येत नाही.

विशेषतः भरतनगर परिसरातील नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचा दावा करत, यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नकाणे रोड आणि वाडीभोकर कॉलनी परिसरातील घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.

महापालिका आयुक्तांनी कार्यालयात बसून केवळ ऑनलाइन बैठका घेण्यापेक्षा प्रत्यक्ष शहरात येऊन पाहणी करावी, असे खुले आव्हान देत शिवसेना उबाठाने, “आमच्यासोबत या, आम्ही तुम्हाला नालेसफाईचा खरा कारनामा दाखवतो,” अशी भूमिका मांडली.

याशिवाय नालेसफाईसाठी पूर्वी सुमारे ५० लाख रुपयांत होणारे काम आता तब्बल २५० लाख रुपयांच्या वाढीव निविदेद्वारे करण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला. या अतिरिक्त २०० लाख रुपयांच्या खर्चामागील कारणांची चौकशी व्हावी आणि या निधीचा लाभ नेमका कोणाला होणार, असा सवाल पक्षाने उपस्थित केला आहे. धुळेकर नागरिकांनी आपल्या कराच्या पैशांचा योग्य वापर होत आहे का, याबाबत जागरूक राहावे आणि सार्वजनिक निधीच्या कथित अपव्ययाविरोधात आवाज उठवावा, असे आवाहनही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आले.

या पाहणीवेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, तेजस गोटे, निंबा मराठे, प्रशांत ठाकूर, प्रभादेवी परदेशी, जयश्री वानखेडे, आनंद जावडेकर, कपिल लिंगायत, निलेश कांजरेकर, मुन्ना पठाण, ईश्तियाक अन्सारी, राजू पाटील, तेजस सपकाळ आणि गुलाब धोबी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version