जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन; ई-केवायसी आणि ईपीओएस यंत्रणेतील अडचणीही मांडल्या
भुसावळ : राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे मागील सात ते आठ महिन्यांपासूनचे लाखो रुपयांचे थकीत मार्जिन तातडीने वितरित करण्यात यावे, तसेच मे आणि जून महिन्याच्या धान्य वितरणाची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सरकारकडून अनुदान आणि कमिशन वेळेत मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदार गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. मागील सात ते आठ महिन्यांपासून लाखो रुपयांचे मार्जिन थकीत असल्याने दुकानदारांना घरखर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, दुकानांचे भाडे, वीजबिल आणि इतर दैनंदिन खर्च भागवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
संघटनेने यापूर्वीही मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला असल्याचे सांगितले. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने दुकानदारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याशिवाय शासनाने सक्तीची केलेली ई-केवायसी प्रक्रिया आणि त्यातील तांत्रिक अडचणींचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने ईपीओएस मशीन बंद पडतात. परिणामी लाभार्थ्यांना वेळेवर धान्य वितरण करण्यात अडथळे निर्माण होतात. अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे ग्राहक आणि दुकानदारांमध्ये वाद निर्माण होण्याची वेळ येत असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले.
या सर्व समस्यांचा विचार करून थकीत कमिशन तातडीने वितरित करावे, ई-केवायसी प्रक्रियेसाठी तांत्रिक सुविधा सक्षम कराव्यात आणि मे-जून महिन्याच्या धान्य वितरणासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनीलभाऊ पाटील, जिल्हा सचिव सुनीलभाऊ अंभोरे, जिल्हा संघटक बाळाभाऊ भालशंकर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कैलास उपाध्याय, भुसावळ तालुका अध्यक्ष महेंद्रभाऊ सपकाळे तसेच यावल तालुका अध्यक्ष दिलीप मोरे उपस्थित होते.
