‘निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी छोटासा प्रयत्न’ म्हणत झाडांच्या संगोपनाचीही घेतली जबाबदारी; वाढदिवस व शुभप्रसंगी एक झाड लावण्याचे ग्रामस्थांना आवाहन
भवरखेडे (अजय बाविस्कर) : पर्यावरण संवर्धनाची गरज दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असताना भवरखेडे (ता. धरणगाव) येथील युवकांनी एक आदर्शवत उपक्रम राबवत समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. गावातील युवा ग्रुपच्या सदस्यांनी स्वखर्चातून एकत्र येत विविध ठिकाणी तब्बल ५० झाडांची लागवड करून पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे, केवळ झाडे लावून थांबण्याऐवजी ती मोठी होईपर्यंत त्यांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारीही या तरुणांनी स्वतःवर घेतली आहे.
सध्या वाढते तापमान, बदलते हवामान आणि कमी होत चाललेले हरित क्षेत्र या पार्श्वभूमीवर वृक्षलागवडीचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. याच सामाजिक जाणीवेतून भवरखेडेतील युवकांनी पुढाकार घेत गावातील मोकळ्या जागा आणि सार्वजनिक ठिकाणी विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली.
युवकांनी या उपक्रमासाठी कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता स्वतःच्या खर्चातून रोपे खरेदी केली आणि नियोजनबद्ध पद्धतीने त्यांची लागवड केली. झाडांना नियमित पाणी, संरक्षण आणि आवश्यक निगा राखण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न राहता पर्यावरण संवर्धनाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनातून राबविण्यात येत असल्याचे दिसून येते.
यावेळी गावातील तरुणांनी सांगितले की, “झाड लावणे म्हणजे केवळ एक काम नाही, तर ती सृष्टीला दिलेली सुंदर भेट आहे. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. त्याचे ऋण फेडण्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येकाने आयुष्यात किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन केले, तर भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत होईल.”
या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांनी ग्रामस्थांनाही सामाजिक संदेश दिला आहे. वाढदिवस, लग्न, गृहप्रवेश किंवा इतर कोणत्याही शुभप्रसंगी केक कापण्याऐवजी किंवा अनावश्यक खर्च करण्याऐवजी एक तरी झाड लावा आणि त्याचे संगोपन करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
भवरखेडेतील युवकांच्या या पुढाकाराचे गावकऱ्यांसह परिसरातूनही कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास निश्चितच हातभार लागणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सामाजिक बांधिलकी जपत निसर्गप्रेमाची जपणूक करणाऱ्या या तरुणांनी इतर गावांसाठीही एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
