Spread the love

१६ जून ते ३१ जुलैदरम्यान अतिसार प्रतिबंध अभियान, तर २८ जून रोजी पल्स पोलिओ मोहीम; बालआरोग्याबाबत जनजागृतीवर भर

भडगाव (गणेश रावड) :  महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत १६ जून ते ३१ जुलै या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘स्टॉप डायरिया कॅम्पेन’ तसेच २८ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर भडगाव येथे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. समाधान वाघ यांनी सांगितले की, अर्भक व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी अतिसार प्रतिबंध आणि योग्य व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येणाऱ्या ‘स्टॉप डायरिया कॅम्पेन’द्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करून बालकांना वेळेवर उपचार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

अतिसार हे बालमृत्यूमागील प्रमुख कारणांपैकी एक असले तरी वेळेत ओआरएस द्रावण व झिंक गोळ्यांचा वापर केल्यास आणि आवश्यक वैद्यकीय उपचार मिळाल्यास अनेक गंभीर परिणाम टाळता येतात. त्यामुळे या अभियानांतर्गत स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी, हात धुण्याच्या योग्य पद्धती, स्तनपानाला प्रोत्साहन, पूरक आहाराचे महत्त्व, वैयक्तिक स्वच्छता, संसर्ग प्रतिबंध आणि लसीकरणाबाबत व्यापक जनजागृती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पल्स पोलिओ मोहिमेबाबत माहिती देताना डॉ. वाघ यांनी सांगितले की, भारताला २०१४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून पोलिओमुक्त देश म्हणून प्रमाणपत्र मिळाले असले तरी शेजारील काही देशांमध्ये अद्याप पोलिओचे रुग्ण आढळत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून २८ जून रोजी देशभर पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना २८ जून रोजी विविध बूथवर पोलिओ प्रतिबंधक डोस दिला जाणार आहे. त्यानंतर २९ जूनपासून ग्रामीण भागात पुढील तीन दिवस आणि शहरी भागात पुढील पाच दिवस घरोघरी जाऊन मोहिमेदिवशी वंचित राहिलेल्या बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात येणार आहेत.

कार्यशाळेत ग्रामीण रुग्णालय भडगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज जाधव यांच्यासह तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही मोहिमा प्रभावीपणे राबवून प्रत्येक पात्र बालकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version