Spread the love

गळा, डोके व शरीरावर सपासप वार; गंभीर जखमी महिलेवर जळगावात उपचार, दोन आरोपी पोलिस कोठडीत

भडगाव (गणेश रावड) : भडगाव शहरातील यशवंतनगर परिसरात जुन्या वादातून एका महिलेवर लोखंडी हुकासारख्या धारदार वस्तूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर जळगाव येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, भडगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावल्याने या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यशवंतनगर येथील रहिवासी कविता सुरेश पाटील यांचा शेजारी राहणारे असलम बिस्मिल्ला शेख आणि त्यांची पत्नी शमीन असलम शेख यांच्याशी काही दिवसांपासून वाद सुरू होता. किरकोळ कारणांवरून दोन्ही कुटुंबांमध्ये वारंवार शाब्दिक चकमकी होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

शुक्रवारी रात्री सुमारे नऊ वाजेच्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला. सुरुवातीला झालेला वाद काही क्षणांतच हिंसक वळणावर पोहोचला. संतापाच्या भरात संशयितांनी लोखंडी हुकासारख्या वस्तूने कविता पाटील यांच्यावर सपासप वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांच्या गळ्यावर, डोक्यावर आणि शरीराच्या विविध भागांवर गंभीर जखमा झाल्या. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्यांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या.

महिलेच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यांनी तत्काळ जखमी महिलेला मदत करत भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील खासगी रुग्णालयात हलविले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुरावे गोळा केले. तसेच प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे जबाब नोंदविण्यात आले. या प्रकरणी जखमी महिलेची सून राधा सागर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून असलम बिस्मिल्ला शेख आणि शमीन असलम शेख यांच्याविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पुढील तपासासाठी त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकूरवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुशील सोनवणे या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून हल्ल्यामागील नेमके कारण, वापरण्यात आलेले हत्यार आणि पूर्वीच्या वादाचे स्वरूप याचा शोध घेतला जात आहे.

या थरारक घटनेमुळे यशवंतनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. परिसरात पोलिस गस्त वाढविण्याची मागणीही स्थानिकांकडून करण्यात येत असून तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version