कान्हा व्यास यांच्या सुमधुर भजनांनी भाविक मंत्रमुग्ध; शेकडो भक्तांची उत्स्फूर्त उपस्थिती
नशिराबाद : नशिराबाद येथील सुनसगाव फाट्याजवळील मंगलमूर्ती लॉन येथे श्री श्याम परिवार, जळगाव-नशिराबाद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य ‘श्याम संकीर्तन’ सोहळा शनिवारी भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्याला नशिराबादसह जळगाव परिसरातील शेकडो भाविकांनी उपस्थित राहून बाबा श्याम यांच्या दर्शनाचा आणि संगीतमय भजनांचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून प्रसिद्ध भजन गायक कान्हा व्यास (ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) यांनी आपल्या सुमधुर आवाजात बाबा श्याम यांच्या महिम्याचे वर्णन करणारी एकापेक्षा एक सरस भजने सादर केली. त्यांच्या सुरेल गायकीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. “हरे का सहारा, बाबा श्याम हमारा” या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने उपस्थित भाविक भारावून गेले.
भजनांच्या तालावर अनेक भक्तांनी टाळ्यांच्या गजरात आणि भक्तिभावाने नृत्य करत आपली श्रद्धा व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान भक्तीचा अविस्मरणीय माहोल अनुभवायला मिळाला.
सोहळ्यासाठी मंगलमूर्ती लॉन येथे आकर्षक आणि भव्य मंडप उभारण्यात आला होता. फुलांनी सजविण्यात आलेला बाबा श्याम यांचा देखणा दरबार उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरला. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसेच शिस्तबद्ध नियोजनामुळे भाविकांना कोणत्याही अडचणीशिवाय कार्यक्रमाचा आनंद घेता आला.
हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री श्याम परिवार, जळगाव, नशिराबाद आणि अण्णा नगर येथील सर्व सदस्य, पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या समारोपाला महाआरती करण्यात आली आणि उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
उशिरापर्यंत रंगलेल्या या संगीतमय आणि भक्तिमय श्याम संकीर्तन सोहळ्यामुळे संपूर्ण नशिराबाद नगरी भक्तीच्या रंगात रंगून गेली होती. उपस्थित भाविकांनी अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात आध्यात्मिक ऊर्जा आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली.
