भाजपकडून सात नावांवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा; 120 हून अधिक इच्छुकांमुळे राजकीय चर्चांना उधाण
सचिन काळभोर, सुजाता पलांडे आणि संजोग वाघेरे यांची नावे संभाव्य यादीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांच्या नियुक्तीबाबत सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील तीन सभांमध्ये हा विषय प्रलंबित राहिल्यानंतर आता आचारसंहिता संपुष्टात आल्यामुळे या बैठकीत स्वीकृत नगरसेवक पदांचा प्रस्ताव चर्चेसाठी घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी याबाबत माहिती देताना, स्वीकृत नगरसेवक पदांबाबतचा विषय लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, शहरातील तब्बल 120 कार्यकर्त्यांनी या पदांसाठी इच्छा व्यक्त केली असून अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवडसाठी सात स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित केली जाणार आहेत. सचिन काळभोर, सुजाता पलांडे आणि संजोग वाघेरे यांची नावे संभाव्य यादीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून स्वीकृत नगरसेवक पदांसाठी तीन नावांची शिफारस करण्यात आल्याचेही समोर आले आहे. भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे सात नावांच्या घोषणेला विलंब झाल्याची चर्चा असली तरी याबाबत पक्षाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
शत्रुघ्न काटे यांनी जून किंवा जुलै महिन्यात स्वीकृत नगरसेवक पदांचा विषय निश्चितपणे निकाली निघेल, असे सांगत अंतिम नावे पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व जाहीर करेल, असे स्पष्ट केले आहे.
भाजपमधून महेश कुलकर्णी, अमोल थोरात, तेजस्विनी कदम, मधुकर बच्चे, राजेश पिल्ले आणि सचिन काळभोर यांच्यासह कुणाल लांडगे, उमेश चांदगुडे, नामदेव ठाके, विलास मडेगिरी आणि संजोग वाघेरे पाटील यांची नावेही चर्चेत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, काही इच्छुकांबाबत विविध आरोप आणि प्रकरणांच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्या तरी संबंधित बाबींवर अधिकृत निष्कर्ष किंवा न्यायालयीन निर्णय समोर आलेला नाही. त्यामुळे अंतिम उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठी कोणते निकष लावतात आणि कोणाला संधी मिळते, याकडे कार्यकर्ते आणि शहरातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
