Spread the love

औक्षण करून नवागतांचे स्वागत, गुणवंतांचा सत्कार आणि पाठ्यपुस्तकांसह पेन व गुलाबपुष्पांचे वितरण

चौगाव | प्रतिनिधी :

न्यू एज्युकेशन सोसायटी, आर्वी संचलित कै. श्री. व्ही. एन. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चौगाव येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शैक्षणिक जनजागृतीसाठी काढण्यात आलेली विद्यार्थ्यांची भव्य रॅली आणि सजविलेली बैलगाडी हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.

कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत चौक, चौगाव येथून शैक्षणिक जनजागृती रॅलीने झाली. वाद्यवृंदाच्या तालावर विद्यार्थ्यांनी जल्लोषात सहभाग घेत नृत्याचा आनंद लुटला. आकर्षक पद्धतीने सजविलेल्या बैलगाडीने ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

रॅलीनंतर विद्यालयात इयत्ता पाचवीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके, पेन आणि गुलाबपुष्प देऊन नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमाला शालेय समितीचे चेअरमन प्रभाकर वेडू मासुळे, सरपंच तथा प्रशासक लीलाताई सिताराम बागले, गणेश बाचलकर, संचालक प्रमोद बागले, माजी उपसरपंच तुकाराम शिंदे, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब सैंदाणे, जगन्नाथ मासुळे, बापू मासुळे, दिगंबर गवळी, योगेश गवळी, योगेश महाले, बोरसे दादा यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन मुख्याध्यापक तथा प्राचार्य आर. एल. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सूत्रसंचालन जे. बी. शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन एन. जे. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात झाल्याने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version