Spread the love

‘चार वर्षांत तिसऱ्यांदा मीटर बदलण्याची वेळ; आधी वीजपुरवठ्याच्या मूलभूत सुविधा सुधारा’, अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर

धुळे (सुनील निकम) : धुळे शहरासह जिल्ह्यात महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्यासंदर्भात ग्राहकांना एसएमएस व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ४८ तासांची पूर्वसूचना दिली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने तीव्र आक्षेप नोंदवत या प्रक्रियेला विरोध दर्शविला आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न केल्यास व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने महावितरण प्रशासनाला दिला आहे.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता जितेंद्र महाजन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात स्मार्ट मीटर बसविण्याची सध्याची प्रक्रिया नियमबाह्य व दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या मते, केंद्र शासनाच्या १७ ऑगस्ट २०२१ च्या अधिसूचनेनुसार कोणत्याही ग्राहकावर सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्याची तरतूद नाही. तसेच मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकेतील निर्देशांनुसार ग्राहकाच्या संमतीशिवाय मीटर बदलणे बेकायदेशीर ठरू शकते, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. याशिवाय विद्युत कायदा २००३ मधील कलम ५५ आणि एमईआरसी विद्युत पुरवठा संहिता २०२१ चा उल्लेख करत मीटर बदलासाठी १५ दिवसांची नोटीस अपेक्षित असताना केवळ ४८ तासांची सूचना ग्राह्य धरता येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बदलण्याचा अधिकार महावितरणला आहे का, स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात वाढ झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, तांत्रिक बिघाड किंवा चुकीच्या रीडिंगबाबत हमी दिली जाणार का, ग्रामीण भागातील नेटवर्क समस्येमुळे ही व्यवस्था प्रभावी ठरणार का, ग्राहकांच्या वापराच्या माहितीची डेटा सुरक्षा कशी राखली जाणार आणि स्मार्ट मीटर नको असलेल्या ग्राहकांसाठी पर्याय काय असेल, अशा प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावीत, अशी मागणी करण्यात आली.

शिवसेनेने धुळे शहरातील वीज वितरण व्यवस्थेवरही नाराजी व्यक्त केली. वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे, उघड्या डीपी, लोंबकळणाऱ्या विद्युत तारा, कमी विद्युत भार आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे ग्राहक त्रस्त असल्याचे सांगत, “चार वर्षांत तिसऱ्यांदा मीटर बदलण्यापेक्षा आधी सेवा सुधाराव्यात,” अशी भूमिका मांडण्यात आली.

महावितरणने ग्राहकांवर जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख धीरज पाटील, युवा नेते तेजस गोटे, प्रशांत भामरे, डॉ. अनिल पाटील, प्रभादेवी परदेशी, संगीता जोशी, जयश्री वानखेडे, अरुणा मोरे, सुनिता शिरसाट, शिवाजी शिरसाळे, कपिल लिंगायत, पंकज भारस्कर, सुरज भावसार, सागर निकम, सागर साळवे, छोटू गवळी, दीपक जाधव, गुलाब धोबी, तेजस सपकाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version