Spread the love

विकासकामांतील अनियमिततेच्या आरोपांवर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; निष्पक्ष चौकशीची नागरिकांची मागणी

शहादा (संजय मोहिते) प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या मौजे कवठळ (ता. शहादा) ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारीवर तब्बल पाच महिने उलटूनही ठोस चौकशी न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणात प्रशासनाकडून होत असलेल्या विलंबामुळे विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित केले जात असून निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरत आहे.

माहितीनुसार, ५ जानेवारी २०२६ रोजी शहादा पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीतील सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या कालावधीत झालेल्या विकासकामांबाबत लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीत १५ वा वित्त आयोग निधी, पेसा निधी, घनकचरा व्यवस्थापन निधी तसेच इतर शासकीय योजनांतील कामांमध्ये कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी संबंधित कामांची माहिती, आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, बिले आणि छायाचित्रांसह सखोल चौकशी करून जबाबदारांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, पाच महिन्यांनंतरही चौकशीबाबत कोणतीही ठोस प्रगती झालेली नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

या प्रकरणावरून काही नागरिकांनी पंचायत समिती प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ग्रामपंचायतींमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून, संबंधित आरोपांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी पुढे येत आहे.

तक्रारदारांनी यापूर्वीच इशारा दिला होता की, कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालय, नंदुरबार येथे आंदोलन व उपोषण करण्यात येईल. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे, चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमली जाणार का आणि तक्रारीवरील निर्णय कधी होणार, याकडे शहादा तालुक्यासह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version