‘चला शिवरायांची युद्धकला आत्मसात करूया’ या संकल्पनेतून पारंपरिक शस्त्रकला, आत्मसंरक्षण आणि संस्कारांचे अनोखे प्रशिक्षण
भुसावळ : महिलांचे सक्षमीकरण, युवकांमध्ये शौर्य, शिस्त आणि स्वसंरक्षणाची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने ‘भक्ती शक्ती शिवकालीन युद्धकला गुरुकुलम, अण्णा नगर’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले भव्य ‘शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. “चला शिवरायांची युद्धकला आत्मसात करूया” या संकल्पनेवर आधारित या शिबिराला भुसावळकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि जय मातृभूमी क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते १४ जून दरम्यान संतोषी माता हॉल शेजारील जय मातृभूमी क्रीडा मैदानावर हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. ६ ते ६० वर्षे वयोगटातील विद्यार्थी, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने या शिबिरात सहभाग नोंदवला.
रायगडचे प्रमुख प्रशिक्षक आशिषजी खैरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थ्यांना शिवकालीन युद्धकलेचे विविध पैलू शिकविण्यात आले. भारतीय पारंपरिक व्यायामप्रकारांमध्ये दंड-बैठक, लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा आणि भाला चालविण्याचे प्रात्यक्षिक यांसह विविध शस्त्रकलेचे प्रशिक्षण देण्यात आले.
विशेषतः मुली आणि महिलांसाठी स्वसंरक्षणाचे स्वतंत्र सत्र आयोजित करण्यात आले होते. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या सामान्य वस्तूंच्या सहाय्याने संकटाच्या प्रसंगी स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे उपस्थित महिलांनी या उपक्रमाचे विशेष स्वागत केले.
शिबिरात शारीरिक प्रशिक्षणाबरोबरच बौद्धिक आणि सांस्कृतिक विकासालाही प्राधान्य देण्यात आले. भारतीय संस्कृती, रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे पराक्रम तसेच स्वातंत्र्यवीरांच्या जीवनचरित्रावर आधारित मार्गदर्शन करण्यात आले. मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी भारतीय पारंपरिक बौद्धिक खेळांचाही समावेश करण्यात आला.
‘भक्ती शक्ती युद्धकला प्रशिक्षण आणि संस्कृती संवर्धन, जळगाव’ संस्थेच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. अवघ्या २०० रुपयांच्या नाममात्र प्रवेश शुल्कात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे सर्वसामान्यांनाही सहभागी होण्याची संधी मिळाली.
शिबिराच्या समारोपावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी सादर केलेल्या मर्दानी खेळांच्या थरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थित पालक आणि नागरिकांची मने जिंकली. शिवकालीन युद्धकलेचा वारसा जपतानाच महिलांना स्वसंरक्षणासाठी सक्षम बनविण्याचा उद्देश या शिबिरातून यशस्वीपणे साध्य झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
