प्रशासनाकडून लेखी आश्वासन आणि प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेला वेग; ७० टक्के काम पूर्ण झाल्याने आंदोलकांचा निर्णय
नशिराबाद | धीरज सैतवाल जैन । प्रतिनिधी
नशिराबाद येथील वाकी नदीच्या दुरवस्थेबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने सामाजिक कार्यकर्ते रोहित बाळू चौधरी यांनी १९ जून २०२६ पासून नशिराबाद नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेत नदी स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू केल्याने त्यांनी आपले प्रस्तावित बेमुदत उपोषण तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
रोहित चौधरी यांनी १० जून रोजी प्रशासनाला उपोषणाबाबत अंतिम निवेदन दिल्यानंतर नशिराबाद नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी १८ जून २०२६ रोजी लेखी पत्राद्वारे वाकी नदी स्वच्छता मोहीम सुरू असल्याची माहिती दिली. नदीपात्रातील कचरा, गाळ आणि इतर अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्रीच्या सहाय्याने टप्प्याटप्प्याने काम सुरू असल्याने उपोषण मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंतीही या पत्रातून करण्यात आली.
प्रशासनाच्या या भूमिकेची दखल घेत रोहित चौधरी यांनी प्रत्यक्ष वाकी नदी परिसराची पाहणी केली. यावेळी नदीपात्रातील सुमारे ७० टक्के स्वच्छता व साफसफाईचे काम पूर्ण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी तसेच नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लेखी पत्र देऊन प्रस्तावित बेमुदत उपोषण तूर्तास मागे घेत असल्याची माहिती दिली.
याबाबत प्रतिक्रिया देताना रोहित बाळू चौधरी म्हणाले, “प्रशासनाने आमच्या निवेदनाची सकारात्मक दखल घेत वाकी नदी स्वच्छतेच्या कामाला गती दिली आहे, ही समाधानाची बाब आहे. त्यामुळे आम्ही उपोषण सध्या स्थगित करत आहोत. मात्र, नदीच्या स्वच्छतेचे शंभर टक्के काम पूर्ण होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेवर आमचे बारकाईने लक्ष राहील.”
दरम्यान, नगर परिषदेच्या टपाल संकलन केंद्राने उपोषण स्थगितीचे पत्र स्वीकारले असून त्याची प्रत नशिराबाद पोलीस प्रशासनालाही पाठविण्यात आली आहे. या सकारात्मक घडामोडींमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून वाकी नदी पूर्णपणे स्वच्छ होऊन पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
