समर्पण बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम; पर्यावरण संवर्धन व वाचन संस्कृतीचा दिला सामाजिक संदेश, पुढील पाच वर्षांत २ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प
धरणगाव | प्रतिनिधी (वाल्मिक पाटील)
सध्याच्या काळात वाढदिवस साजरा करण्याच्या बदलत्या पद्धतींमध्ये केक कापणे, फटाक्यांची आतषबाजी आणि भव्य पार्ट्यांचा ट्रेंड वाढत असताना धरणगाव येथील निसर्गप्रेमी तथा समर्पण बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक महेंद्र रुपचंद तायडे यांनी आपल्या ४१ व्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी प्रेरणादायी ठरेल असा आगळावेगळा उपक्रम राबविला.
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त तसेच मोरया नगरातील दिवंगत मित्र ॲड. विवेक पाटील, देवेंद्र पाटील, देविदास पाटील, दिनेश शिरसाठ आणि चेतन ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समर्पण बहुउद्देशीय संस्था व चिंतामणी मोरया नगर मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने धरणगाव व परिसरात २०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. याचबरोबर समाजात वाचन संस्कृतीला चालना मिळावी या उद्देशाने २०० प्रेरणादायी ग्रंथांचे वाटप करून सामाजिक प्रबोधनाचाही संदेश देण्यात आला.
या उपक्रमांतर्गत वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, बेल, आंबा, अशोक, जांभूळ आणि अर्जुन यांसारख्या पर्यावरणपूरक व दीर्घायुषी वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणासोबतच ग्रंथ भेट देण्याच्या अभिनव संकल्पनेमुळे पर्यावरण संवर्धन आणि वैचारिक समृद्धी यांचा सुंदर संगम घडून आला.
कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनअभावी अनेकांना जीव गमवावा लागल्याची वेदनादायी परिस्थिती अनुभवायला मिळाली. त्यातूनच पर्यावरण संवर्धनाची गरज अधिक अधोरेखित झाल्याचे सांगत महेंद्र तायडे यांनी भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवागार वारसा निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “वृक्ष हे मानवजीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत. ते कोणतीही अपेक्षा न ठेवता प्राणवायू, सावली, अन्न आणि पर्यावरणाचा समतोल प्रदान करतात. प्रत्येकाने आपल्या वाढदिवसासारख्या आनंदाच्या क्षणांना सामाजिक उपक्रमांशी जोडले, तर समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते. पुढील पाच वर्षांत दोन हजार वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा माझा संकल्प आहे.”
वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असून तापमानवाढ, पाणीटंचाई आणि प्रदूषण यांसारख्या समस्या गंभीर होत आहेत. अशा परिस्थितीत महेंद्र तायडे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण संरक्षणासह सामाजिक समता, एकात्मता आणि वैचारिक प्रबोधनाचा संदेश देणारा ठरला आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ललित मराठे, दीपक सूर्यवंशी, किशोर खैरनार, गणेश मराठे, चेतन सोनवणे, सागर ठाकरे, भूषण पाटील, आकाश साठे, आकाश बिवाल, मनोज गुजर, रमेश माळी, विजय सोनवणे, सुजल वाणी, अनंत धारणे, विजय महाजन, श्याम अहिरे, मयूर भामरे, संतोष सोनवणे, मुकेश लोहार, भरत शिरसाठ, गणेश गुरव, राजू कुंभार, राधे चौधरी, दीपक माळी, अमोल सूर्यवंशी, तेजस पाटील, नंदा महाजन, बाळासाहेब जाधव, साई पवार, बंटी महाजन, दिव्येश मराठे, बापू मोरे, समाधान मराठे, धीरू अहिरे, राज पवार, यश पाटील, लक्ष्मीकांत पित्रोडा, सोहम पाटील, हेमंत माळी, पी. डी. पाटील, गोरख देशमुख, नगर मोमीन, करीम लाला, राहुल पाटील यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
■ “वाढदिवसापासून समाजकारणाकडे…”
केवळ शुभेच्छा आणि उत्सवापुरता वाढदिवस मर्यादित न ठेवता पर्यावरण संवर्धन, वाचन संस्कृतीचा प्रसार आणि दिवंगत मित्रांच्या स्मृती जपण्याचा संदेश देणारा महेंद्र तायडे यांचा हा उपक्रम धरणगाव परिसरात चर्चेचा विषय ठरला असून, समाजासाठी प्रेरणादायी आदर्श म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
