Spread the love

जिल्ह्यात खत-बियाणांचा मुबलक पुरवठा करा, अवाजवी दराने विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा

धुळे | सुनील निकम । प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यात बोगस बियाणे आणि बनावट खतांच्या विक्रीवर तात्काळ पायबंद घालावा, जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात दर्जेदार खत व बियाणांचा पुरवठा सुनिश्चित करावा तसेच अवाजवी दराने खत विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

संघटनांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात, दरवर्षी बोगस खत व बियाणांमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वर्षभर मेहनत करून पीक उभे करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशांवर अशा बनावट उत्पादनांमुळे पाणी फिरत असल्याने कृषी विभागाने याप्रकरणी अधिक सतर्क भूमिका घेण्याची गरज असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

यंदा पावसाचे आगमन लांबल्याने अनेक शेतकऱ्यांची पेरणी अद्याप प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत बाजारात बोगस बियाणे आणि बनावट खतांचा शिरकाव होण्याची शक्यता अधिक असल्याने कृषी विभागाने तातडीने विशेष तपासणी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

दरम्यान, जिल्हा कृषी अधीक्षकांनी बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना दिली. मात्र, प्रत्यक्षात प्रभावी कारवाई न झाल्यास व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनांच्या वतीने देण्यात आला.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत भडक यांच्यासह महेश पाटील, नितीन जाधव, भाऊसाहेब पाटील, डी. आर. जाधव, अमर फरताडे, कैलास देसले आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version