जिल्हा क्रीडा संकुलाच्या जलतरण तलावात विविध जलयोगासनांचे सादरीकरण; आरोग्यदायी फायद्यांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
धुळे | सुनील निकम । प्रतिनिधी
जागतिक योग दिनानिमित्त धुळे शहरात अनोख्या पद्धतीने ‘वॉटर योगा’चे आयोजन करण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुलाच्या जलतरण तलावात पार पडलेल्या या विशेष उपक्रमात सत्तर वर्षांवरील शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत पाण्यातील विविध योगासनांचे सादरीकरण केले. त्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
धन्वंतरी मेडिकल फाउंडेशन, आरएसएस गौशाळा, डोंगरे महाराज ग्रुप आणि धुळे पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या वॉटर योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वाढत्या वयातही निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी भारत सरकार मान्यताप्राप्त योग शिक्षक डॉ. जगदीश गिंदोडिया यांनी पाण्यातील योगाचे महत्त्व स्पष्ट करत नियमित वॉटर योगामुळे शरीराची लवचिकता वाढते, मानसिक संतुलन सुधारते, वजन नियंत्रणास मदत होते तसेच अनेक शारीरिक व्याधींवर सकारात्मक परिणाम होतो, अशी माहिती दिली. त्यांनी विविध ज्येष्ठ नागरिकांसह प्रत्यक्ष पाण्यात योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बेलदार यांच्यासह महेश घुगे, मुन्ना गिंदोडिया, कैलास पसारी, ॲड. राजेंद्र निकुंभ, संजय गिंदोडिया, ॲड. आनंद जगदेव, मोहन बंग, सागर आघाव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागतिक योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या अनोख्या वॉटर योगा उपक्रमातून ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य, तंदुरुस्ती आणि सकारात्मक जीवनशैलीचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचवला.
