Spread the love

गुजरातमधून महाराष्ट्रात सुरू असलेल्या इंधन तस्करीचा पर्दाफाश; साक्री तालुक्यातील अवैध अड्ड्यावर धडक छापा, तस्करांच्या रॅकेटमध्ये खळबळ

धुळे | सुनील निकम । प्रतिनिधी

गुजरातमधून महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवैध इंधन आणि एलपीजी गॅस तस्करीविरोधात अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी धडक कारवाई करत तब्बल 1 कोटी 55 लाख 95 हजार 114 रुपयांचा अवैध एलपीजी गॅस, डिझेल साठा, टँकर आणि वाहने जप्त केली आहेत. या कारवाईमुळे आंतरराज्यीय तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून संबंधित विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

दक्षता पथकाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गुजरात-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील साक्री तालुक्यातील दहिवल परिसरात अवैध इंधन साठवण आणि तस्करीचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने तातडीने कारवाई करत ‘अन्नपूर्णा धाब्या’च्या मागील परिसरात आणि ‘पार्श्वनाथ धाब्या’च्या शेजारी असलेल्या अड्ड्यावर छापा टाकला.

छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर, डिझेलचा साठा, दोन मोठे टँकर तसेच इतर वाहने आणि तस्करीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 1 कोटी 55 लाख 95 हजार 114 रुपये असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, गुजरात राज्यातून स्वस्त दरात इंधन आणि एलपीजी गॅस महाराष्ट्रात आणून त्याची बेकायदेशीररीत्या विक्री केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून तस्करीच्या संपूर्ण साखळीचा शोध घेण्यासाठी संबंधित यंत्रणांनी चौकशीची गती वाढवली आहे. राज्यस्तरीय दक्षता पथकाच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे इंधन तस्करीत सहभागी असलेल्या आंतरराज्यीय नेटवर्कमध्ये मोठी खळबळ उडाली असून, आगामी काळात अशा अवैध व्यवसायांविरोधात आणखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version