शहाद्यात प्रकाशा चौफुलीवर राष्ट्रीय महामार्ग तब्बल तासभर ठप्प; पेपर लीक प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीसह केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
शहादा | प्रतिनिधी (संजय मोहिते)
नीट यूजी परीक्षेतील कथित पेपर लीक प्रकरण तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांच्या कार्यपद्धतीतील कथित अनियमिततेच्या निषेधार्थ युवक काँग्रेस आणि राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) यांच्या वतीने शहादा येथील प्रकाशा चौफुलीवर गुरुवारी तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक जवळपास तासभर पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
महाराष्ट्रासह देशभरात वारंवार समोर येणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. संतप्त कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. सुमारे एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आणि शिष्टमंडळाने प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. शहादा तहसीलदार संभाजी पाटील, तालुका पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आलेल्या निवेदनात नीट पेपर लीक प्रकरणाची उच्चस्तरीय अथवा न्यायालयीन चौकशी करून दोषींवर तसेच संपूर्ण रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) च्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करून संस्थेची पुनर्रचना करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी झालेल्या कथित अन्यायाची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील आणि NSUIचे जिल्हाध्यक्ष सागर पावरा यांनी केले. यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष दीपक पटेल तसेच युवक काँग्रेस प्रभारी जयंतकुमार सोनवणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या हितासाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रकाशा बसस्थानक परिसर, तळोदा चौफुली तसेच राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन शांततेत पार पडले असले तरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
