अति उच्चदाब विद्युत मनोरे स्थलांतराच्या कामात खर्चात मोठी कपात; आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते अभियंत्यांचा गौरव
भांडुप येथील २००० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात अभियंत्यांची स्मार्ट नियोजनशैली; प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला सन्मान
मुंबई | प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भांडुप संकुलात उभारण्यात येत असलेल्या २००० दशलक्ष लीटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामात पाणी पुरवठा प्रकल्प विभागातील अभियंत्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महापालिकेची सुमारे ७ कोटी ४८ लाख रुपयांची आर्थिक बचत केली आहे. अति उच्चदाब विद्युत मनोरे स्थलांतरित करण्याच्या कामात प्रभावी नियोजन आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर ही बचत शक्य झाली.
या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी संबंधित अभियंत्यांचा महापालिका मुख्यालयात प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.
या सन्मान सोहळ्यात कार्यकारी अभियंता राजेश कापडणीस, सहायक अभियंता ऋषिकेश वर्तक, दुय्यम अभियंता गुरुराज ऐवळे आणि दुय्यम अभियंता सुबोध नाखरेकर यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
भांडुप येथे उभारण्यात येणारा हा जलशुद्धीकरण प्रकल्प मुंबईच्या भविष्यातील वाढत्या पाणी गरजा लक्षात घेऊन विकसित केला जात असून, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या अति उच्चदाब विद्युत मनोऱ्यांच्या स्थलांतराच्या प्रक्रियेत अभियंत्यांनी पर्यायी तांत्रिक उपाययोजनांचा अवलंब केला. त्यामुळे प्रकल्पाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता मोठ्या प्रमाणावर खर्चात बचत करण्यात यश आले.
या कार्यक्रमाला उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्तम माळवदे तसेच प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प) सी. डी. चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
महानगरपालिका प्रशासनाने अभियंत्यांच्या या कार्याचे कौतुक करत अशा नाविन्यपूर्ण आणि खर्चबचतीच्या उपक्रमांमुळे सार्वजनिक निधीचा अधिक कार्यक्षम वापर होण्यास मदत होत असल्याचे नमूद केले. तसेच भविष्यातही विकासकामांमध्ये तांत्रिक कौशल्य, प्रभावी नियोजन आणि पारदर्शकतेच्या माध्यमातून नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
