Spread the love

१८.३४ कोटींच्या विकासकामांना लवकर मंजुरीची मागणी; ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी आधुनिक सुविधांवर भर

धुळे | सुनिल निकम । प्रतिनिधी

धुळे जिल्हा क्रीडा संकुलाचा सर्वांगीण विकास करून जिल्ह्यातील खेळाडूंना अत्याधुनिक आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना महाराष्ट्र सहसचिव ॲड. पंकज गोरे यांनी पुढाकार घेतला आहे. वाढीव अनुदानातून प्रस्तावित विकासकामांच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना तांत्रिक मान्यता मिळावी, यासाठी त्यांनी मुंबई व नाशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी धुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आधुनिक क्रीडा संकुलाचे महत्त्व अधोरेखित करत, उत्कृष्ट सुविधा उपलब्ध झाल्यास येथूनही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसेच ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडू शकतात, अशी भूमिका ॲड. गोरे यांनी मांडली.

शासनाने जिल्हा क्रीडा संकुलासाठी अनुदान मर्यादेत वाढ केल्यानंतर त्याअंतर्गत विविध विकासकामांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यास मंजुरीही मिळाली आहे. त्यानंतर धुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष यांनी काही अतिरिक्त विकासकामांचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वास्तुविशारद संस्थेमार्फत सुधारित अंदाजपत्रक व आराखडे तयार करून तांत्रिक मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहेत.

प्रस्तावित विकासकामांमध्ये ४०० मीटर सिंथेटिक रनिंग ट्रॅक, मुलींच्या वसतिगृहाचा दुसरा मजला, फुटबॉल मैदान, कुस्ती व जिम्नॅस्टिक हॉल, पेव्हर ब्लॉक बसविणे, भूमिगत पाणी टाकी, जलतरण तलावाची दुरुस्ती, संरक्षण भिंत आणि संपूर्ण मैदानासाठी विद्युत व प्रकाशयोजना यांचा समावेश आहे.

या सर्व कामांसाठी सुमारे १८ कोटी ३४ लाख २० हजार ७२१ रुपये इतका अंदाजित खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. संबंधित आराखडे आणि अंदाजपत्रकांना तातडीने तांत्रिक मान्यता देण्यात यावी, जेणेकरून पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन विकासकामांना गती मिळेल, अशी विनंती ॲड. पंकज गोरे यांनी मुख्य अभियंता प्रशांत औटी यांच्याकडे केली.

धुळे जिल्हा क्रीडा संकुलाचा विकास झाल्यास स्थानिक खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होतील आणि भविष्यात धुळे जिल्ह्याचे खेळाडू राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकून महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर घालतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या भेटीदरम्यान शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख पंकज भाऊ भारस्कर हे देखील उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version