Spread the love

भारत-मालावी आर्थिक संबंधांना मिळणार नवी गती; उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महत्त्वाचे पाऊल

पुणे | प्रतिनिधी (शंकर जोग)

भारत आणि मालावी यांच्यातील व्यापार व आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भारतातील मालावीचे उच्चायुक्त लिओनार्ड मेंगेझी यांनी पुण्याचे डॉ. संकेत खरपुडे यांची पुणे व महाराष्ट्र क्षेत्रासाठी मालावीचे ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशनर (TIC) म्हणून अधिकृत नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती भारत आणि मालावी यांच्यातील द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि व्यावसायिक सहकार्य वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. व्यापार आणि गुंतवणूक आयुक्त हे पद राजनैतिक आणि आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असून, दोन्ही देशांमधील उद्योग व व्यावसायिक संबंध मजबूत करण्यासाठी या पदाची भूमिका निर्णायक असते. ही नियुक्ती केवळ डॉ. खरपुडे यांच्यासाठीच नव्हे, तर पुणे आणि महाराष्ट्राच्या उद्योगविश्वासाठीही अभिमानाची बाब मानली जात आहे.

गुंतवणूक आणि व्यापार विस्तारावर भर
ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशनर म्हणून डॉ. संकेत खरपुडे यांच्यावर महाराष्ट्रातील उद्योजकांना मालावीमधील गुंतवणुकीच्या संधींची माहिती देणे, दोन्ही देशांतील व्यापारवृद्धीस चालना देणे आणि व्यावसायिक नेटवर्क मजबूत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कृषी, तंत्रज्ञान, शिक्षण, उत्पादन आणि सेवा क्षेत्रात भारत आणि मालावी यांच्यातील आयात-निर्यात वाढविण्यासाठी ते विशेष प्रयत्न करणार आहेत. तसेच दोन्ही देशांतील व्यावसायिक समुदायांमध्ये दुवा म्हणून काम करत नवीन उद्योग संधी निर्माण करण्यावर त्यांचा भर असेल.

पुण्याच्या उद्योगविश्वासाठी मोठी संधी
पुणे हे देशातील प्रमुख औद्योगिक, आयटी आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते. त्यामुळे डॉ. खरपुडे यांच्या नियुक्तीमुळे पुणे आणि महाराष्ट्रातील उद्योगांना आफ्रिकन बाजारपेठेत, विशेषतः मालावीमध्ये व्यवसाय विस्ताराची नवी दालने खुली होणार आहेत.

या माध्यमातून स्थानिक उद्योग, स्टार्टअप्स, निर्यातदार आणि गुंतवणूकदारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे व्यासपीठ उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच भारत-मालावी आर्थिक सहकार्य अधिक बळकट होऊन व्यापारवृद्धीस चालना मिळणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

सर्व स्तरांतून अभिनंदन
डॉ. संकेत खरपुडे यांच्या या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल उद्योग, शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून पुणे आणि महाराष्ट्रातील उद्योगांना जागतिक स्तरावर नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version