Spread the love

पाणी जपून वापरण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

प्रशासनाची संयुक्त मोहीम; अनधिकृत पाणी उपशावर कडक कारवाईचा इशारा, नागरिकांना दिलासा

जळगाव | प्रतिनिधी

जिल्ह्यातील नागरिकांना उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार महसूल, जलसंपदा आणि पोलीस विभागाच्या समन्वयातून शनिवार, २० जून २०२६ रोजी सकाळी ६ वाजता गिरणा धरणामधून पिण्याच्या पाण्यासाठी बिगर सिंचन आवर्तन सुरू करण्यात आले. हे यंदाच्या हंगामातील शेवटचे आवर्तन असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

या आवर्तनाद्वारे गिरणा नदीपात्रात सुमारे २००० क्युसेक्स (५६.६३ क्युमेक्स) पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या आदेशानुसार गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.

केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच आवर्तन
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हे आवर्तन केवळ पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी सोडण्यात आले असून शेतीसाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी पाण्याचा वापर करू नये. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी पंप बंद ठेवावेत तसेच नदीपात्रातून कोणत्याही प्रकारचा अनधिकृत पाणी उपसा करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

संयुक्त पथकांची गस्त सुरू
जलसंपदा विभागाच्या १३ जून २०२६ च्या परिपत्रकानुसार, एल-निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करून ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाची संयुक्त पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके नदीपात्रात नियमित गस्त घालून अनधिकृत मोटारी, पंप, पाईपलाईन आणि बेकायदेशीर पाणी उपशावर लक्ष ठेवणार आहेत.

अनेक गावांना मिळणार दिलासा
हे आवर्तन भडगाव, पाचोरा तसेच दहिगाव बंधारा ते कानळदा परिसरापर्यंत पोहोचणार असल्याने या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“पाणी जपून वापरणे ही काळाची गरज”
याबाबत बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “गिरणा धरणातून सोडण्यात आलेले हे पाणी केवळ पिण्याच्या गरजांसाठी आहे. प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाणी वाचवणे ही काळाची गरज असून प्रशासनाला सहकार्य करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.”

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शासन आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आणि नदीकाठच्या भागात सतर्क राहण्याचे आवाहन केले.

प्रशासनाचा इशारा
नदीपात्रातून बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून उपलब्ध पाणीसाठ्याचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version