ज्ञानसंवाद कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. प्रकाश पाठक यांचे प्रतिपादन
भालोद, ता. भुसावळ (संघरत्न सपकाळे) : शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. समाजजीवनात सकारात्मक विचारांची पेरणी करणारा शिक्षकच खऱ्या अर्थाने देशाचा शिल्पकार असतो. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान आणि आदर जपणे ही समाज व शासनकर्त्यांची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत प्रा. प्रकाश पाठक यांनी केले.
कृषीमित्र स्वर्गीय हरीभाऊ जावळे मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित ‘ज्ञानसंवाद’ कार्यक्रमात कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथे ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणेशदादा नेहेते होते. यावेळी रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोलदादा जावळे, चेअरमन हेमलताताई इंगळे, संस्थेचे सचिव भास्करदादा पिंपळे, ज्येष्ठ संचालक अरुणदादा चौधरी यांच्यासह परिसरातील १४ माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. पाठक यांनी आपल्या मार्गदर्शनात शिक्षणव्यवस्थेतील बदलत्या आव्हानांवर भाष्य करताना सांगितले की, शिक्षणाचा अर्थ आपण केवळ गुणांपुरता मर्यादित ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मन आणि मनगटाचा विकास अपेक्षित प्रमाणात झाला नाही. शिक्षणाने केवळ बुद्धिमत्ता नव्हे, तर संवेदनशीलता, मूल्ये आणि कृतीशीलता देखील विकसित झाली पाहिजे. विद्यार्थ्यांना फक्त परीक्षार्थी न बनवता आदर्श नागरिक घडविणे ही शिक्षण व्यवस्थेची खरी जबाबदारी आहे.
“विद्यार्थ्यांचे बौद्धिक, वैचारिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कलात्मक पैलू विकसित होण्यासाठी शिक्षकांनी अधिक व्यासंगी, अभ्यासू आणि विवेकी होणे आवश्यक आहे. विद्यार्थी शिक्षकांचे अनुकरण करतात. त्यामुळे शिक्षकांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व आदर्शवत घडविले पाहिजे. शिक्षक हे केवळ रोजगाराचे पद नसून सेवा आणि समर्पणाचे दायित्व आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करताना आमदार अमोलदादा जावळे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच त्यांच्या नेतृत्वगुणांचा विकास व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना विविध कौशल्याधारित विषय शिकण्याची संधी उपलब्ध होणार असून, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी नेतृत्वक्षम, सक्षम आणि मूल्याधिष्ठित पिढी घडविणे आवश्यक आहे.
“ग्रामीण भागातील सामाजिक, सांस्कृतिक, कृषी आणि राजकीय प्रश्न सोडविण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच प्रभावी पर्याय आहे. शिक्षकांनी स्वतःला अद्ययावत ठेवून विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्त्वे घडवली तर समाज आणि राष्ट्र प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचेल,” असेही ते म्हणाले. शिक्षकांच्या शैक्षणिक प्रश्नांसाठी आपण नेहमी त्यांच्या पाठीशी राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
चेअरमन हेमलताताई इंगळे यांनी संस्थेच्या शताब्दीपूर्तीच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हेच कोणत्याही संस्थेचे खरे बळ असल्याचे सांगितले. “सेवाभावी शिक्षक आणि कर्मचारी हीच आमच्या संस्थेची खरी श्रीमंती आहे. शिक्षकांनी मनापासून ठरवले तर समाजातील अनेक अवगुण कमी होऊ शकतात. शिक्षक या व्यक्तिमत्त्वावर माझा दृढ विश्वास आहे,” असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. जतीन मेढे यांनी तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कोल्हे यांनी केले. या कार्यक्रमास परिसरातील १४ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांतील १३३ शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
