Spread the love

प्रख्यात योग शिक्षिका दिपाली कोल्हे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; योग, प्राणायाम व ध्यानधारणेचे महत्त्व पटवून दिले

नशिराबाद (प्रतिनिधी) धीरज सैतवाल : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, नशिराबाद येथे विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जळगाव येथील प्रख्यात योग शिक्षिका सौ. दिपाली कोल्हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेचा अनुभव घेतला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ. दिपाली कोल्हे यांनी योग, प्राणायाम, ध्यानधारणा, कपालभाती आणि अनुलोम-विलोम यांचे मानवी जीवनातील महत्त्व सविस्तरपणे स्पष्ट केले. योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर करून विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष सराव करून घेतला. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवत त्यांनी मनाची आणि मेंदूची एकाग्रता वाढविणे, अभ्यासात लक्ष केंद्रित करणे तसेच सकारात्मक विचारसरणी विकसित करण्यासाठी योगाची भूमिका अधोरेखित केली.

आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत योग हा निरोगी आरोग्याचा आधारस्तंभ ठरू शकतो. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढतो, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना योगाचे वैज्ञानिक महत्त्व आणि आरोग्यदायी जीवनासाठी त्याची आवश्यकता समजली. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.

कार्यक्रमाच्या शेवटी न्यू इंग्लिश स्कूल परिवाराच्या वतीने सौ. दिपाली कोल्हे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. उपस्थितांनी नियमित योगाभ्यास करून निरोगी व सकारात्मक जीवन जगण्याचा संकल्प केला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version