Spread the love

विद्यार्थ्यांनी घेतला विविध योगासनांचा अनुभव; ‘योग करा, निरोगी रहा’चा संदेश

भडगाव, गणेश रावड । प्रतिनिधी : कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर, भडगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागरूकता निर्माण व्हावी तसेच निरोगी जीवनशैलीचा संदेश पोहोचावा या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक योगासनांनी झाली. यावेळी योग मार्गदर्शक ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करत प्रत्येक आसनाचे आरोग्यदायी महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध योगासने सादर केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहते, एकाग्रता वाढते तसेच दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. योग हा निरोगी आणि संतुलित जीवनाचा आधार असल्याने प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करावा, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी योगाचे महत्त्व जाणून घेत नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, शिस्त आणि सकारात्मक विचारांची जाणीव निर्माण झाली. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संगीता शेलार, सुनीता देवरे, अनिता सैंदाणे, अनंत हिरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, हर्षल पाटील, किरण पाटील, सुयोग पाटील, सचिन पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी चंद्रकांत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. “योग करा, निरोगी रहा” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

◆ ठळक मुद्दे :

  • आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

  • विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

  • विविध योगासने व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

  • आरोग्य, शिस्त आणि सकारात्मक विचारांचा संदेश

  • नियमित योगाभ्यासाचा विद्यार्थ्यांनी घेतला संकल्प

Share.
Leave A Reply

Exit mobile version