Spread the love

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मागणीनुसार पीकविमा, नुकसानभरपाई व विशेष आर्थिक मदतीवर होणार चर्चा

पाळधी/जळगाव : जळगाव जिल्ह्यासह राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्या, मंगळवार दि. २३ जून २०२६ रोजी दुपारी १.४५ वाजता विधान भवन, मुंबई येथील मुख्यमंत्री समिती कक्षात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे यापूर्वी दि. १० जून रोजी मंत्रालयात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय (दत्ता मामा) भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विशेष चर्चा करण्यात आली होती.
या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पिक विम्याबाबत तसेच MRSAC अहवालाबाबत तांत्रिक अडचणी तसेच केळी उत्पादकांना विशेष आर्थिक सहाय्य देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी मध्यप्रदेशच्या धर्तीवर नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना प्रति हेक्टर दोन लाख रुपये विशेष मदत देण्याची जोरदार मागणी केली होती.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मांडलेल्या मागण्यांबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सकारात्मक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
उद्याच्या बैठकीत केळी बागायतदारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, पीकविमा दावे, अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा, केळी उत्पादन व विपणनाशी संबंधित प्रश्न तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे.

बैठकीस पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. अमोल जावळे, आ. मंगेश चव्हाण, आ. चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रधान सचिव (जलसंपदा), सचिव (कृषी व पणन विभाग) तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी, स्थानिक बँकांचे प्रतिनिधी आणि एमआरएसएसीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version