Spread the love

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; सुरतमधील तिघे आरोपी जेरबंद, मुळ स्त्रोताचा शोध सुरू

धुळे : सुनील निकम ।

मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीकारक औषधांच्या अवैध विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल १० लाख ५१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात सुरत येथील तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून गुंगीकारक कफ सिरपच्या अवैध रॅकेटचा तपास सुरू करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी गुंगीकारक औषधांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने ही धडक मोहीम राबवली. त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सुरतहून मालेगावकडे गुंगीकारक कफ सिरपचा साठा नेला जात असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुरकुंबा परिसरातील उण पुलाखाली सापळा रचला. संशयित इनोव्हा कार (GJ-16/BB-2607) दिसताच पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या कफ सिरपच्या बाटल्या आढळून आल्या.

याप्रकरणी वाहन चालक एजाज रफीक शेख (वय २५, रा. सलाबादपुरा, सुरत) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून ४१ हजार २५० रुपये किमतीच्या गुंगीकारक कफ सिरपच्या बाटल्या, १० लाख रुपये किमतीची इनोव्हा कार आणि १० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १० लाख ५१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) आणि औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी पुढील कारवाई करत सुरत येथून प्रवीण जिवाराम सिरवी (वय ३२) आणि इरफान ऊर्फ भिका इस्माईल मुलतानी (वय ३३) या आणखी दोन आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांकडून या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असून जप्त करण्यात आलेला माल नेमका कोठून आणण्यात आला, त्यामागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे आणि या अवैध व्यवसायाचे मूळ सूत्रधार कोण आहेत, याचा शोध घेतला जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंठे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version