ब्लॅकमेलिंग व बदनामीचा आरोप; आरोपीविरोधातील गुन्ह्यांची यादीही पोलीस प्रशासनाला सादर
धुळे | सुनील निकम । प्रतिनिधी
गुन्ह्यातील फरार आरोपीकडून कुटुंबीयांचे खासगी फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल करून ब्लॅकमेलिंग व बदनामी केली जात असल्याचा गंभीर आरोप करत शिंदे कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. फरार आरोपी निलेश राजू देवरे याला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी सुमित शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आरोपी निलेश देवरे हा फरार असतानाही समाजमाध्यमांचा वापर करून कुटुंबातील सदस्यांचे खासगी फोटो प्रसारित करत आहे. यामुळे कुटुंबाची बदनामी होत असून मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. तसेच आरोपीकडून ब्लॅकमेलिंगचे प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
चोरलेल्या मोबाईलचा गैरवापर केल्याचा आरोप
शिंदे कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, चोरलेल्या मोबाईलचा वापर करून पत्नीच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते तयार करण्यात आले आहे. या खात्याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोपीकडून भविष्यात आणखी गंभीर प्रकार घडू शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
आरोपीविरोधातील गुन्ह्यांची माहिती पोलीसांकडे
यावेळी शिंदे कुटुंबीयांनी आरोपी निलेश देवरे याच्याविरोधात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांची यादीही जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर केली. आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
निवेदन स्वीकारल्यानंतर पोलीस प्रशासनाने प्रकरणाची दखल घेत आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. यावेळी सुमित शिंदे, ज्योती सुभाष शिंदे, रेखा संजय शिंदे, मनीषा प्रदीप जाधव, योगेश सुनील सूर्यवंशी, हितेश देवेंद्र बरेलीकर, विशाल मनोज चव्हाण, विजय श्रीराम अहिरे, सोनू विधाते आदी उपस्थित होते.
