२५ जूनपर्यंत स्वच्छता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा; धार्मिक भावना व आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
नशिराबाद | धीरज सैतवाल । प्रतिनिधी
आगामी मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर मणियार मोहल्ला परिसरातील वाकी नदी किनाऱ्याची तातडीने स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि मोहरम कमिटीच्या वतीने नशिराबाद नगर परिषद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले असून नगर परिषदेच्या टपाल संकलन केंद्राने ते अधिकृतपणे स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे.
कचरा आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त
मणियार मोहल्ला परिसरातील वाकी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, दुर्गंधीयुक्त कचरा आणि घाणीचे ढीग साचले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसराला कचरा कुंडीचे स्वरूप प्राप्त झाले असून स्थानिक नागरिकांसह भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. आगामी २६ जून रोजी मोहरम सण साजरा होणार असल्याने धार्मिक कार्यक्रमांवरही या अस्वच्छतेचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
२५ जूनपर्यंत स्वच्छतेची मागणी
निवेदनात प्रशासनाला २५ जून २०२६ पर्यंत संपूर्ण परिसराची स्वच्छता करून कचरा हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. सणापूर्वी परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवणे ही नगर परिषदेची जबाबदारी असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे.
आंदोलनाचा इशारा
निर्धारित मुदतीत स्वच्छता न झाल्यास मणियार मोहल्ल्यातील रहिवासी आणि मोहरम कमिटीच्या वतीने नगर परिषद प्रशासनाविरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन स्वच्छता मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे
