Spread the love

ई-पॉस यंत्रणेतील तांत्रिक अडचणींमुळे हजारो लाभार्थी धान्यापासून वंचित; मुदतवाढीची मागणी

भुसावळ | संघरत्न सपकाळे ।

भुसावळ तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांसमोर अन्नधान्य वितरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ई-पॉस यंत्रणेतील तांत्रिक अडचणींमुळे रेशन धान्य वाटप प्रक्रिया अक्षरशः ठप्प झाली आहे. केंद्र शासनाने मे आणि जून महिन्यांचे धान्य १५ जूनपर्यंत वितरित करण्याचे निर्देश दिले असले, तरी अनेक लाभार्थ्यांना अद्याप धान्य मिळाले नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

केंद्र सरकारने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मे महिन्यात झालेल्या हमालांच्या संपामुळे धान्य पुरवठा आणि वितरण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. परिणामी धान्य दुकानदारांकडे पोहोचण्यात उशीर झाला आणि संपूर्ण प्रक्रिया विस्कळीत झाली.

जून महिन्याच्या धान्य वाटपातही अडथळे

मे महिन्याच्या धान्य वितरणासाठी शासनाने १५ जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र त्याच कालावधीत जून महिन्याच्या धान्य वाटपाचे आदेश आल्याने गोंधळ अधिक वाढला. तालुक्यातील सुमारे ३० ते ४० टक्के लाभार्थ्यांना जून महिन्याचे धान्य अद्याप मिळालेले नाही.

रेशन दुकानदारांच्या ई-पॉस मशीनमध्ये जून महिन्याच्या धान्य वितरणाची नोंदच दिसत नसल्याने धान्य वाटप पूर्णपणे अडकले आहे. त्यामुळे लाभार्थी आणि दुकानदार दोघेही संभ्रमात सापडले आहेत.

मुदतवाढीसाठी शासनाकडे मागणी

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा विभागाने राज्य शासनाकडे धान्य वितरणासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. तसेच ऑल इंडिया फेअर प्राईस डीलर फेडरेशन आणि अखिल भारतीय राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघ यांच्या वतीनेही केंद्र शासनाकडे जून महिन्याच्या धान्य वाटपाची मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्याची विनंती करण्यात आली आहे.

हजारो लाभार्थ्यांमध्ये चिंता

धान्य वितरणातील या गोंधळामुळे हजारो रेशनकार्डधारकांना त्यांच्या हक्काच्या धान्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने तातडीने तांत्रिक अडचणी दूर करून धान्य वितरण सुरळीत करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version