खुडाणे परिसरातील डोंगराळ भागातील घटना; पशुपालकाचे लाखोंचे नुकसान, शासनाकडून मदतीची मागणी
साक्री (धुळे) | प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील खुडाणे गाव परिसरात निसर्गाने भीषण तडाखा दिला असून वीज कोसळल्याने तब्बल ४० मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खुडाणे गावाजवळील डोंगराळ भागात मेंढपाळ ज्ञानेश्वर तिरताप हे नेहमीप्रमाणे मेंढ्यांचा कळप चारत होते. दरम्यान, अचानक पावसासह वादळी वारे आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. याचवेळी कळपाजवळ वीज कोसळल्याने ४० मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला.
मृत झालेल्या मेंढ्या या जैताणे येथील धनराज जीपा तिरताप यांच्या मालकीच्या असल्याचे समोर आले आहे. एका क्षणात कळपातील ४० मेंढ्या दगावल्याने पशुपालकावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
मेंढपाळालाही बसला विजेचा झटका
या घटनेदरम्यान मेंढपाळ ज्ञानेश्वर तिरताप यांनाही विजेचा सौम्य झटका बसला. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
पंचनामा व मदत प्रक्रियेला सुरुवात
घटनेची माहिती मिळताच खुडाणे गावचे पोलीस पाटील अनिल जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. संबंधित महसूल व पशुसंवर्धन विभागाला माहिती देण्यात आली असून पंचनामा आणि नुकसानभरपाई प्रक्रियेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
निसर्गाच्या एका तडाख्यात ४० मुक्या जीवांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून शासनाने पशुपालकाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
