उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला, बचत गट आणि ग्रामसंघांचा गौरव; साडेचार कोटींच्या आर्थिक व्यवहाराला सर्वानुमते मंजुरी
शहादा | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत पंचायत समिती शहादा येथील जिल्हा परिषद गट लोणखेडा अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘दिव्यशक्ती महिला प्रभागसंघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. २३ जून) एस. कुमार लॉन्स येथे मोठ्या उत्साहात आणि हजारो महिलांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेत तीन ग्रामसंघांना तब्बल २८ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला, स्वयं सहाय्यता बचत गट आणि ग्रामसंघांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर “इतनी शक्ती हमें देना दाता…” या प्रार्थनेने सभेच्या मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ झाला. प्रभाग समन्वयक सुचिता सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले, तर अध्यक्षस्थान दिव्यशक्ती प्रभागसंघाच्या अध्यक्षा गंगा वसावे यांनी भूषविले.
प्रभागसंघाच्या लेखापाल ललिता सोनवणे यांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल सादर केला. यामध्ये साडेचार कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा तपशील मांडण्यात आला. उपस्थित सदस्यांनी हा अहवाल सर्वानुमते मंजूर केला. बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन मिळवत ‘लखपती दीदी’ बनलेल्या महिलांनी आपले अनुभव कथन करत इतर महिलांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन केले.
सभेदरम्यान उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सीआरपी, नियमित कर्जफेड करणारे महिला स्वयं सहाय्यता गट, सामाजिक समावेशन व उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ग्रामसंघ आणि उत्पादक गट यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
उमेदचे तालुका व्यवस्थापक ईश्वर जगदाळे यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण कसे घडते याविषयी मार्गदर्शन केले. तर कुणाल कानडे यांनी उद्योग-व्यवसायाच्या संधी व व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाला मलोनी, वडछील, सावखेडा, कमरावद, डोंगरगाव, शोभानगर, उजलोद, लोणखेडा आणि पुरुषोत्तमनगर येथील महिला बचत गटांच्या हजारो महिला उपस्थित होत्या. तसेच किशोर बिरारे, दिलीप बैसाने, योगेश पाटील, हर्षल पाटील, विद्या वसावे, योगेश कोळी, विलास पवार, निखिल शिर्के, पुरुषोत्तम बागुल यांच्यासह अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश देवकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुचिता सूर्यवंशी यांनी केले. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
