Spread the love

हेल्मेट व गुलाबपुष्प देऊन गौरव; राष्ट्रीय पातळीवरील निवडीमुळे कासोदा व खान्देशच्या शिरपेचात मानाचा तुरा

कासोदा (ता. एरंडोल)। अॅड. वासुदेव वारे । येथील प्रतिष्ठित उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते शैलेश मंत्री यांची अखिल भारतीय माहेश्वरी समाजाच्या राष्ट्रीय सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याने कासोदा परिसरासह संपूर्ण खान्देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च समितीमध्ये बिनविरोध निवड झाल्याने शैलेश मंत्री यांनी समाजकारण आणि संघटनात्मक कार्यातील आपली छाप अधोरेखित केली आहे. त्यांच्या निवडीमुळे कासोदा व खान्देशच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शैलेश मंत्री यांचा गुलाबपुष्प आणि हेल्मेट भेट देऊन अनोख्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत रस्ते सुरक्षा जनजागृतीचा संदेश देणारे हेल्मेट भेट देण्यात आल्याने या सत्काराची विशेष चर्चा रंगली.

सत्कार समारंभाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे खान्देश संपर्क प्रमुख सागर शेलार, ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र ठाकरे, कायदेतज्ज्ञ ॲड. वासुदेव वारेकैलास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी शैलेश मंत्री यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्याचे कौतुक करत राष्ट्रीय स्तरावरही ते खान्देशचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त केला. सत्काराला उत्तर देताना शैलेश मंत्री यांनी सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानत समाजहिताच्या कार्यासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version