Spread the love

दुचाकी सुरक्षित करण्यासाठी गेलेल्या ३२ वर्षीय शेतकऱ्यावर आकाशातून संकट; अमळनेर तालुक्यात हळहळ

एरंडोल | प्रतिनिधी (मयुर पाटील)

अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज कोसळून एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि. २३) दुपारी घडली. या घटनेमुळे शहापूर गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

मृत शेतकऱ्याचे नाव राकेश रतिलाल पाटील (वय ३२) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश पाटील हे आपल्या आईसह शेतात कामासाठी गेले होते. यावेळी शेतात काही मजूरदेखील काम करत होते. दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने अचानक जोर धरला.

पावसापासून बचाव करण्यासाठी राकेश यांची आई आणि मजूर जवळच असलेल्या लिंबाच्या झाडाखाली आश्रयाला थांबले. दरम्यान, आपली दुचाकी सुरक्षित ठिकाणी उभी करण्याच्या उद्देशाने राकेश पाटील रस्त्याकडे गेले. मात्र, याचवेळी अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली.

विजेचा जबरदस्त फटका बसल्याने राकेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. एका क्षणात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहापूर परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून, मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version